
Disha Patani House Firing: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली इथल्या घराबाहेर शुक्रवारी सकाळी गोळीबार झाला. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन्स परिसरातील दिशाच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेनंतर आरोपी नैनीताल महामार्गाच्या दिशेने पळून गेले. गोळीबाराची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये हल्लेखोर ‘अपाचे’ बाईकवरून जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. हल्लेखोरांपैकी बाईक चालवणाऱ्या तरुणाने हेल्मेट घातलं होतं. तर मागे बसलेल्या व्यक्तीने बाईकवरून खाली उतरून दिशाच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील कुत्रे भुंकू लागले आणि त्यानंतर काही सेकंदातच दोघं आरोपी बाईकवरून पळाले. बरेली शहराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर कॅमेऱ्यांची तपासणी करून पोलिसांनी आरोपींचा पळून जाण्याचा मार्ग शोधून काढण्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे दिल्ली-रामपूर महामार्गावरील झुमका तिरहा इथून शहरात घुसले. त्यानंतर ते मिनी बायपासमार्गे किला रोड मार्गे नैनीतालला पोहोचले. तिथून ते विल्याधामकडे जाताना दिसले. त्यानंतरचं त्यांचं लोकेशन कॅमेऱ्यात आढळलं नाही. जर आरोपी थेट महामार्गावरून पुढे गेले असते तर ते टोल प्लाझाच्या कॅमेऱ्यात कैद झाले असते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. कुख्यात गुंड गोल्डी ब्रार गँगने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.
या गँगशी संबंधित असलेल्या रोहित गोदाराच्या आयडीवरून पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय की, दिशाची बहीण खुशबू पटानीने स्वामी अनिरुद्धाचार्य आणि स्वामी प्रेमानंद यांच्याबद्दल केलेल्या कमेंटमुळे संतापल्याने गँगकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. भविष्यात असं पुन्हा घडलं तर हत्येसारखी कारवाई केली जाई, अशी धमकीही या पोस्टमध्ये देण्यात आली होती. या घटनेत वापरलेले पिस्तूल परदेशी बनावटीचे असल्याचंही तपासात समोर आलं आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून दिशाचे कुटुंबीय आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांची सुरक्षा वाढण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.