Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना आताच्या आता अटक करा..; दिशा सालियानच्या वडिलांची सीबीआयकडे मागणी
Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. तिचे वडील सतीश सालियान यांनी नुकताच आपला जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी थेट आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली यांची नावं घेतली आहेत.

Disha Salian Case: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं, याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचा दावा केला. जबाब नोंदवताना त्यांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काही व्यक्तींची नावं घेतल्याचं सांगितलं. सतीश सालियान यांनी CBI अधिकाऱ्यांसमोर आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता सूरज पांचोली, डिनो मोरिया आणि काही बॉडीगार्ड्स यांची नावं घेतल्याचं म्हटलं आहे. मुलीच्या मृत्यूशी संबंधित जे काही तथ्य आपल्याला माहीत आहे, तेच आपण अधिकाऱ्यांना सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
‘आताच्या आता अटक करा’
जबाब नोंदवल्यानंतर माध्यमांशी बोलताना सतीश सालियान यांनी CBIकडे कठोर कारवाईची मागणी केली. “आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती यांना आताच्या आता अटक करा आणि जी शिक्षा असेल ती सुनवा,” अशी मागणी त्यांनी केली. आपल्या मुलीसोबत जे घडलं, त्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे आणि घेतलेली नावं नोंदवून घेतली आहेत. अधिकाऱ्यांनी पुढील काही दिवसांत या प्रकरणातील कार्यवाही सुरू केली जाईल, असं सांगितल्याचा दावाही सतीश सालियान यांनी केला.
पहा व्हिडीओ-
#WATCH | Mumbai, Maharashtra: Disha Salian’s father, Satish Salian, says, “I stated the facts exactly as they were—I told them everything that happened to my daughter. I listed all the names—Aditya, Sooraj Pancholi, Dino Morea, and the bodyguards. They noted everything down. They… pic.twitter.com/uM9inRUD1p
— ANI (@ANI) September 11, 2026
‘मी फॅक्ट सांगितले’
सतीश सालियान म्हणाले की, “जे फॅक्ट आहे, जे माझ्या मुलीसोबत घडलं, तेच सर्व मी अधिकाऱ्यांना सांगितलं.” त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मोरिया आणि त्यांच्या बॉडीगार्ड्सची नावं घेतल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, दिशाच्या मृत्यूचं प्रकरण याआधीही अनेकदा राजकीय आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. या प्रकरणात विविध दावे आणि आरोप करण्यात आले आहेत. जबाब नोंदवल्यानंतर सतीश सालियान यांनी सत्याच्या बाजूने न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. “सत्याचा पराभव होऊ शकत नाही. जिथे सत्य असतं, तिथे देव असतो. त्यामुळे न्याय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय महत्त्वाचा आदेश सुनावला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. आता CBI या जबाबाच्या आधारे पुढील तपासात कोणती पावलं उचलते, कोणाची चौकशी केली जाते आणि या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
