डिलिव्हरीबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाली ‘दयाबेन’; म्हणाली “त्या वेदना..”

अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती डिलिव्हरी आणि त्यादरम्यान होणाऱ्या वेदनांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

डिलिव्हरीबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाली दयाबेन; म्हणाली त्या वेदना..
Disha Vakani
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2025 | 10:13 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून अभिनेत्री दिशा वकानी घराघरात पोहोचली. परंतु गेल्या आठ वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. बाळंतपणासाठी तिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र नंतर ती परतलीच नाही. दिशा वकानी मालिकेत परत कधी येणार, हा प्रश्न वारंवार चाहत्यांकडून विचारला जातो. परंतु त्याचं नेमकं उत्तर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांकडेही नाही. अशातच दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच तिच्या गरोदरपणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

“डिलिव्हरीच्या वेळी प्रचंड वेदना होतात. त्या वेदनेशी तुलना कोणत्याच वेदनेशी केली जाऊ शकत नाही. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी पॅरेंटिंगचा कोर्स करत होती. डिलिव्हरीदरम्यान मला कोणीतरी सांगितलं की, तू आई बनणार आहेस, परंतु तू ओरडू शकत नाहीस. जर तू ओरडलीस तर पोटातील बाळ घाबरून जाईल. मग मी मनातच विचार करत होती की वेदना झाल्यावर तुम्ही ओरडणारच ना? कारण शूटिंगदरम्यान मी अनेकदा ऐकलं होतं की डिलिव्हरीदरम्यान अनेक महिला वेदनेनं विव्हळतात आणि ओरडतात. मग मी काय करावं, असा विचार केला. तेव्हा मी गायत्री मंत्राचा जप करू लागले. तो मंत्र जप करता करताच मी बाळाला जन्म दिला”, असं ती म्हणाली.

“मी डोळे बंद करून हसत होती आणि माझी मुलगी स्तुतीचा जन्म झाला. हा चमत्कार मी प्रत्येक गरोदर स्त्रीला सांगू इच्छिते. तुम्ही गायत्री मंत्रचा जप करत राहा, तुम्हाला शक्ती मिळत राहील. तुम्हाला चमत्काराचा अनुभव होईल. हिंदू सनातन धर्मात ज्यांचा जन्म होतो, त्यांना गायत्री मंत्र आपोआप येतंच”, असं दिशाने पुढे सांगितलं.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका 2008 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेव्हापासून मालिकेत दयाबेनची भूमिका दिशा वकानीने साकारली होती. परंतु बाळंतपणासाठी तिने काही काळ ब्रेक घेतला होता. दिशाला दोन मुली आहेत. मुलींच्या जन्मानंतर दिशा तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झाली. त्यामुळे तिने मालिकेत परत येण्याचा विचार केला नाही. प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून दयाबेनच्या कमबॅकची प्रतीक्षा करत आहेत. तर असित मोदीसुद्धा दिशाला मालिकेत परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु अद्याप मालिकेत दयाबेन परतलीच नाही.