
यंदाच्या मे महिन्यात बातमी आली होती की अजय देवगण आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक यांचा पुढचा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी सिनेमागृहांत रिलीज होणार आहे. मात्र, चित्रपटाचं नाव सांगितलं नव्हतं. पण असं म्हटलं जात होतं की हा ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘दृश्यम 3’ असणार आहे. तेव्हापासून अजयचे चाहते या चित्रपटासाठी खूप आतुरतेने वाट पाहात आहेत. आता ‘दृश्यम 3’ या चित्रपटाबाबत एक नवं अपडेट समोर आलं आहे.
खरंतर, क्राइम थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम’च्या दोन्ही भागांत अजय देवगणने विजय साळगावकर या सामान्य माणसाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेवर लोकांनी प्रचंड प्रेम केले. आता तो पुन्हा एकदा या भूमिकेत दिसणार आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं चित्रीकरण पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
मुंबईत होणार सिनेमाचं चित्रीकरण
मेकर्स प्री-प्रोडक्शनचं काम करत आहेत. 12 डिसेंबरपासून चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरू होणार आहे. पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण मुंबईतच वायआरएफ स्टुडिओत होईल. ‘दृश्यम’ हा अजय देवगणचा एक लोकप्रिय चित्रपट आहे. मागील दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सर्वजण दृश्यम ३ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
लोक आता विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबासोबत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, तिसऱ्या भागात कथा कशी पुढे जाईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मागील भागात जसे ट्विस्ट दिसले होते त्याप्रमाणे तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.
मागील दोन्ही भागांनी किती कमाई केली होती?
‘दृश्यम’चा पहिला भाग 2015 साली आला होता. 48 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 110.40 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसरा भाग 2022 साली आला होता. चित्रपट बनवण्यासाठी मेकर्सनी 50 कोटी रुपये खर्च केले होते. जगभरातून या चित्रपटाने 342.31 कोटी रुपये कमावले होते. दोन्ही भागांचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनीच केलं होतं. तिसऱ्या भागाचं दिग्दर्शनही ते करत आहेत. आता सर्वांना तिसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.