माजी नगरसेवकाने केली होती ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची फसवणूक, पहिल्या पत्नीला कळालं अन्…
अभिनेत्री एका माजी नगरसेवकाच्या प्रेमात पडली , त्यांनी लग्न देखील केले . मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतर तिला एक फोन आला आणि त्यानंतर जे सत्य समोर आलं ते सर्व धक्कादायक होत.

‘पप्पी दे पारुला’ या सुपरहिट म्युझिक अल्बममुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर प्रकाशझोतात आली. चित्रपट, रियालिटी शो आणि म्युझिक अल्बममधील विविध भूमिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. पण स्मिताच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक घटना फार कमी लोकांना माहित आहे, ज्याने तिच्या आयुष्याला मोठा धक्का दिला.
सिद्धार्थ बाठियासोबत ओळख आणि लग्न
स्मिता गोंदकरची माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया याच्याशी ओळख झाली. हळूहळू त्यांच्या भेटी वाढल्या आणि त्यांनी लग्नही केलं. वर्सोवा येथे स्मिता आणि सिद्धार्थ एकत्र राहत होते. थाटामाटात झालेल्या या लग्नामुळे स्मिता खूप आनंदी होती. तिला असं वाटत होतं की, तिला मनासारखा जोडीदार मिळाला आहे आणि ती स्वतःला भाग्यवान समजत होती. लग्नानंतर काही काळ त्यांचा संसार सुखाने सुरू होता. वाचा: बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
तीन महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा
लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर स्मिताच्या आयुष्यात भूकंप आला. एका अनोळखी महिलेचा तिला फोन आला. त्या महिलेने सांगितलं, “मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलंही आहेत.” हे ऐकून स्मिताला धक्काच बसला. तिने याबाबत सिद्धार्थला विचारलं असता, त्याने सांगितलं की, त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. “पहिल्या लग्नाबाबत सांगितलं असतं, तर तू लग्नाला तयार झाली नसतीस, म्हणून मी ही गोष्ट लपवली,” असं कारण त्याने दिलं. इतकंच नव्हे, तर त्याने घटस्फोटाची कागदपत्रं आणि स्मितासोबतच्या लग्नाचं प्रमाणपत्रही दाखवलं. स्मिताने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ही बाब विसरून पुन्हा संसारात रमली.
लग्नाचा पहिला वाढदिवस आणि पुन्हा धक्का
स्मिता आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फोटो वृत्तपत्रांमध्येही छापले गेले. पण काही दिवसांनंतर एक महिला स्मिताच्या घरी आली आणि तिने पुन्हा दावा केला की, तीच सिद्धार्थची खरी पत्नी आहे. स्मिताने यावेळी घटस्फोट आणि लग्नाच्या कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा तिला कळलं की, सर्व कागदपत्रं खोटी होती. सिद्धार्थने तिची फसवणूक केली होती.
सिद्धार्थचा बनाव आणि कायदेशीर कारवाई
स्मिताने सिद्धार्थविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांसमोर सिद्धार्थने स्मिताला आपली पत्नी मानण्यास नकार दिला आणि धक्कादायक दावा केला की, “लग्नाचे फोटो खरे नाहीत, ते एका चित्रीकरणादरम्यान काढले गेले होते.” इतकंच नव्हे, तर सिद्धार्थने स्मितासह अनेक तरुणींना असंच फसवलं असल्याचं नंतर समोर आलं. ही बातमी त्यावेळी अनेक वृत्तपत्रांमध्ये झळकली होती.
स्मिताचं पुनरागमन
या सर्व घटनेने स्मिता पूर्णपणे कोलमडून गेली होती. काही काळ ती चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. पण स्वतःला सावरत तिने नव्याने सुरुवात केली आणि पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या धक्कादायक प्रसंगातून तिने स्वतःला सावरलं आणि प्रेक्षकांच्या मनात पुन्हा स्थान मिळवलं.
