
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मोलकरणीचा छळ केला आहे. एवढंच नाही तर, निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तमिळ आणि तेलुगू अभिनेत्री डिंपल हयाती गंभीर अडचणीत सापडली आहे. हैदराबाद पोलिसांनी अभिनेत्री आणि तिचा पती डेव्हिड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीच्या मोलकरणीने त्यांच्यावर छळ, मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप करत तक्रार दाखल केली. हैदराबादमधील फिल्मनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या घरी काम करणाऱ्या तरुणीचं वय 22 वर्ष आहे आणि ती ओडिशा येथील राहणारी आहे. श्री साई गुडविल सर्विसेजच्या माध्यमातून पीडित तरुणी डिंपल हिच्या घरात कामासाठी होती. ती 22 सप्टेंबर रोजी ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातून कामाच्या शोधात हैदराबादला आली होती. तिला डिंपल हयाती आणि तिचा पती डेव्हिड यांच्या घरी मोलकरणीची नोकरी मिळाली.
पीडित तरुणीने जबाबात आरोप केला आहे की, अभिनेत्रीच्या घरी कामाला सुरुवात केल्यापासून सतत अपमानित केलं जात होतं, ज्यामध्ये योग्य जेवण न देणं, शिवीगाळ करणं आणि अपमानास्पद टिप्पणी करणं यांचा समावेश होता. मोलकरणीच्या म्हणण्यानुसार, त्या अभिनेत्री आणि नवऱ्याने तरुणीला असंही सांगितलं की, तिचं आयुष्य त्यांच्या बुटांच्या किमतीलाही किंमत नाही.
मोलकरणीने सांगितल्यानुसार, 29 सप्टेंबर रोजी त्यांच्यामध्ये वाद झाला. डिंपल आणि डेव्हिड यांनी मोलकरणीसोबत गैरवर्तण केलं आणि आई – वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा तरुणीने व्हिडीओ रेकॉर्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डेव्हिडने फोन हिसकावून घेतला आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
मोलकरीणाने असाही दावा केला की, हाणामारीदरम्यान तिचे कपडे फाटले होते आणि निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप केला. अखेर मोलकरणीने तिच्या एजंटच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आणि थोडक्यात बचावली.
डिंपल हयाती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये तिने तेलुगू ‘गल्फ’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘अकरंगी रे’ सिमेमात देखील दिसली. याशिवाय अभिनेत्रीने ‘देवी 2’, ‘खिलाडी’, ‘यूरेका’, Ramabanam आणि Veeramae Vaagai Soodum सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.