मराठी चित्रपटांचा अमेरिकेत डंका! नाफा 2025 महोत्सवासाठी ‘या’ 4 मराठी चित्रपटांची निवड
मराठी चित्रपटांची दखल जागतिक पातळीवरही घेतली जात आहे. नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी चार चित्रपटांची निवड झाली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मराठी चित्रपटांची दखल जागतिक पातळीवरही घेतली जात आहे. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) ने गेल्या वर्षी पहिला ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ यशस्वीरित्या आयोजित केला होता. यानंतर आता या वर्षी 25 ते 27 जुलै 2025 दरम्यान सॅन होजे येथील कॅलिफोर्निया थिएटरमध्ये हा महोत्सव आयोजित केला जात आहे. या महोत्सवासाठी चार चित्रपटांची निवड झाली आहे. यात गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नोफ्लॉवर’, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘मुक्ताई’, अनिल भालेराव दिग्दर्शित ‘छबीला’, निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ या चित्रपटांचा समावेश आहे.
‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांसाठी राष्ट्रीय गोल्डन लोटस पुरस्कार विजेते निर्माता अभिजित घोलप यांनी ‘नाफा’ची स्थापना केलेली आहे. हे अमेरिका आणि कॅनडामधील मराठी चित्रपटांसाठी एक जागतिक व्यासपीठ आहे. यंदाच्या महोत्सवात मराठी स्टार्ससोबतच, प्रसिद्ध हॉलिवूड कलाकार या महोत्सवाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. चार चित्रपटांची निवड झाल्या दिग्दर्शकांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
स्नोफ्लॉवरचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे
‘स्नोफ्लॉवर’ हा मानवी भावना आणि संघर्षाचा एक शोध आहे, जो कायदा लोकांसाठी आहे की लोक कायद्यासाठी आहेत असा प्रश्न विचारतो. NAFA सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर ही कथा सादर होणे हे खरोखरच विशेष आहे. मराठी चित्रपटाला त्याची योग्य आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यात NAFA महत्त्वाची भूमिका बजावते. प्रेक्षकांना ‘स्नोफ्लॉवर’ पाहिल्यानंतर एक आत्मनिरीक्षणात्मक अनुभव मिळेल.
मुक्ताईचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर
पसायदानातील, ‘दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ’ या ओळी ज्ञानेश्वर आणि मुक्ताईच्या तत्वज्ञानाचे सार मूर्त रूप देतात. त्यांची अशी इच्छा होती की हे आध्यात्मिक ज्ञान जगापर्यंत पोहोचले पाहिजे. आता NAFA मुळे, ते स्वप्न साकार होत आहे. या आध्यात्मिक प्रवासाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी NAFA चा मनापासून आभारी आहे.
‘छबीला’चे दिग्दर्शक अनिल भालेराव
‘छबीला’ची कहाणी रघुवीर तांडा नावाच्या एका छोट्याशा गावात सुरू झाली, जिथे अजूनही रस्ते, वीज किंवा पाणी नाही. येथील लोक दगड फोडून कठोर जीवन जगतात. मला अभिमान आहे की ही कहाणी आता समुद्रापलीकडे पोहोचली आहे, यामुळे मी ‘नाफा’चे मनापासून आभार मानतो.
‘रावसाहेब’चे दिग्दर्शक निखिल महाजन
माझा ‘रावसाहेब’ चित्रपट अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी ‘नाफा’ येथे प्रदर्शित होणार आहे याबद्दल मला खूप आनंद होत आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की हा चित्रपट तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही मराठी चित्रपटापेक्षा वेगळा आहे.”
‘नाफा’चे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले म्हणाले की, ‘या चार मराठी चित्रपटांचा अमेरिकन प्रीमियर हा केवळ एक प्रदर्शन नाही, हा अमेरिकन आणि कॅनेडियन व्यासपीठ मराठी चित्रपटांसाठी खुले करण्याची ऐतिहासिक सुरुवात आहे.’
दरम्यान, या महोत्सवाला डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर हे कलाकार उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
