Gaurav Khanna-Akanksha Chamola: माझी घटस्फोटाची पार्टी..; गौरव खन्नाच्या पत्नीचं उत्तर ऐकून भडकले चाहते
Gaurav Khanna-Akanksha Chamola: पापाराझींशी बोलताना आकांक्षा चमोलाने तिच्या घटस्फोटाबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. गौरव आणि आकांक्षा हे गेल्या महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत.

Gaurav Khanna-Akanksha Chamola: टीव्ही अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता आकांक्षा पापाराझींसोबतच्या एका मजेशीर संवादामुळे चर्चेत आली आहे. स्वतःच्या घटस्फोटाबद्दल तिने केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘आधी घर बनवण्यात व्यग्र आहे, त्यानंतर घटस्फोटाची पार्टी करणार’, असं म्हणत तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पापाराझींच्या प्रश्नावर आकांक्षाचं उत्तर
आकांक्षा चमोला सध्या ‘द इंडियन गेम शो’मध्ये दिसत आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. याचदरम्यान आकांक्षा पापाराझींसमोर आली असता तिचा एका फोटोग्राफरसोबत मजेशीर संवाद झाला. या फोटोग्राफरने नुकतंच ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. त्यावर आकांक्षाने त्याला, ‘पार्टी दे रहा है कि नहीं?’ असं विचारलं. त्यानंतर फोटोग्राफरने आकांक्षालाही घटस्फोटानिमित्त पार्टी देणार का, असा प्रश्न विचारला. यावर ती म्हणाली, ‘नाही, मी सध्या घर बनवण्यात व्यग्र आहे. त्यानंतर पार्टी करेन.’ यानंतर दोघांनी एकत्र पार्टी करण्याबद्दल चर्चा केली. त्यावर आकांक्षा हसत म्हणाली, ‘हो, आपण एकत्र करू. तुझी ब्रेकअप पार्टी आणि माझी घटस्फोटाची पार्टी!’ तिच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
तिच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी टीका केली. हिच्याकडे घटस्फोटाशिवाय वेगळं काही बोलायला नाही का, असा खोचक सवाल एका युजरने केला. तर गौरवला आणखी चांगली मुलगी भेटेल, असं दुसऱ्याने म्हटलंय.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

गौरव खन्नापासून का विभक्त झाली आकांक्षा?
गौरव खन्ना हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘अनुपमा’ या मालिकेतील अनुज कपाडिया या भूमिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. गौरव आणि आकांक्षा यांनी 24 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात अंतर निर्माण झालं. ‘लॉकअप 2’च्या प्रीमियरदरम्यान आकांक्षाने आपण आणि गौरव जवळपास वर्षभरापासून वेगवेगळे राहत असल्याचा खुलासा केला होता. दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचंही तिने सांगितलं. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि भविष्यातील अपेक्षा वेगवेगळ्या असल्यामुळे जोडीदार म्हणून आपलं एकमेकांशी जमत नसल्याची जाणीव झाल्याचं तिने स्पष्ट केलं.
विशेष म्हणजे, गौरव आणि आकांक्षा यांच्यात कोणताही कटुतेचा भाव नसल्याचंही तिने सांगितलं होतं. दोघेही एकमेकांशी बोलतात, मात्र पती-पत्नी म्हणून एकत्र राहणं योग्य नसल्याचं त्यांना वाटत असल्याचं आकांक्षाने स्पष्ट केलं.
