16 वर्षांनंतरही कमी झाली नाही या गाण्याची क्रेझ, प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही ठरतंय खास
Gen-Z चं सर्वात आवडतं रोमँटिक गाणं, जे गेल्या 16 वर्षांपासून आहे सुपरहिट. गर्लफ्रेंडला ऐकवताच ती देखील लगेच होते इंप्रेस. आजही या गाण्याची क्रेझ कायम.

हिंदी संगीताची जादू अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. 90च्या दशकातील गाण्यांपासून ते 2000 नंतरच्या रोमँटिक गाण्यांपर्यंत प्रत्येक पिढीची गाण्यांशी एक खास नाळ जोडलेली आहे. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘तुम जो आए जिंदगी में’. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटातील हे रोमँटिक गाणं आजही Millennials आणि Gen-Z मध्ये लोकप्रिय आहे.
‘तुम जो आए जिंदगी में, बात बन गई…’ या ओळी ऐकताच प्रेमाची एक वेगळीच अनुभूती मिळते. या गाण्याला राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार यांनी आवाज दिला असून प्रीतम यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर इरशाद कामिल यांच्या सुंदर शब्दांनी गाण्याला भावनिक खोली मिळाली आहे. प्रेम आयुष्यात आल्यानंतर जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, हे या गाण्यातून सुंदरपणे मांडण्यात आलं आहे.
अजय देवगण-कंगना रनौतची केमिस्ट्री ठरली खास
गाण्यात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री कंगना रनौत यांची केमिस्ट्री पाहायला मिळते. चित्रपटाची पार्श्वभूमी अंडरवर्ल्डची असली तरी या गाण्यात प्रेमाची हळुवार भावना प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. ‘इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई’ यांसारख्या ओळी आजही प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.
या गाण्याशी संबंधित एक खास गोष्ट म्हणजे संपूर्ण गाण्यात अजय देवगण पांढऱ्या रंगाच्या शर्ट-पँटमध्येच दिसतो. त्याच्या लूकमध्ये इतर रंगांचा वापर करण्यात आलेला नाही.
चित्रपटाचीही झाली होती चर्चा
मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’मध्ये अजय देवगणने सुलतान मिर्झाची भूमिका साकारली होती. इमरान हाश्मी शोएब खानच्या भूमिकेत, तर कंगना रनौत रेहाना आणि प्राची देसाई मुमताजच्या भूमिकेत दिसल्या होती. रणदीप हुड्डा यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
सुमारे 38 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात जवळपास 85 कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं जातं. भारतातही चित्रपटाने चांगली कमाई केली होती. मात्र, चित्रपटापेक्षा त्यातील ‘तुम जो आए जिंदगी में’ या गाण्याची लोकप्रियता आजही कायम असल्याचं पाहायला मिळतं.