
निशिकांत कामत दिग्दर्शित ‘फोर्स’ या चित्रपटात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा आणि जॉन अब्राहम यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 2011 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जिनिलिया आणि जॉनने चुकून लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर दोघांनी आजवर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आगामी ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जिनिलियाने अखेर त्यावर मौन सोडलं आहे. 14 वर्षांनंतर ती त्या चर्चांवर मोकळेपणे व्यक्त झाली आहे.
2012 मध्ये जिनिलिया आणि जॉनच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. या चित्रपटामध्ये दोघांच्या लग्नाचा एक सीन होता. या सीनच्या शूटिंगदरम्यान पुजाऱ्याने चुकून जॉन आणि जिनिलियाच्या लग्नाचे विधी पूर्ण केले होते, असं म्हटलं गेलं होतं. ज्या पुजाऱ्याने हा सीन केला, त्या पंडित भागवत गुरूजींनीच यावर जोर दिला होता की या दोघांचं लग्न झालं आहे. सेटवर अनवधानाने सर्व मंत्रा म्हटले गेले होते. इतकंच नव्हे तर वरमाळा, मंगळसूत्र आणि सात फेऱ्यांसह एका खऱ्याखुऱ्या लग्नासाठीचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले होते, असं ते म्हणाले. आता आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जिनिलियाला त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देताना जिनिलिया म्हणाली, “या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. आमचं लग्न झालं नव्हतं. या कहाण्या पीआरकडून पसरवल्या गेल्या होत्या. मला असं वाटतं की तुम्ही त्यांनाच हा प्रश्न विचारायला हवा की त्यांनी असं का केलं?” लग्नाची अफवा केवळ प्रसिद्धीसाठी पसरवल्या गेली होती, असं जिनिलियाने स्पष्ट केलं. त्याचसोबत यात जॉन किंवा तिची काहीच भूमिका नव्हती, असंही तिने म्हटलंय.
या अफवांदरम्यान निर्माते विपुल शाह यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना चित्रपटात पुजाऱ्याच्या भूमिकेसाठी एखाद्या ज्युनिअर आर्टिस्टला घ्यायचं होतं. परंतु सीन खरा वाटावा यासाठी दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी खऱ्या पुजाऱ्याला त्या भूमिकेसाठी घेतलं होतं. “ही माझ्या दिग्दर्शनाच्या खरेपणाबद्दलच्या प्रेमाची किंमत आहे. नंतर तोच पुजारी असा काही दावा करेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती”, असं त्यांनी नंतर स्पष्ट केलं होतं. विपुल यांनी नंतर असंही सांगितलं की जिनिलिया ख्रिश्चन असल्याने हिंदू विवाहपद्धती तिच्यासाठी लागू होत नाहीत. परंतु हे सर्व पब्लिसिटीसाठी केल्याच्या चर्चांना त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.
“मी केवळ प्रसिद्धीसाठी असं का करेन? जर माझा हाच उद्देश असता तर मी सहजपणे स्वत:च एखाद्या हिंदू संघटनेला त्यात सहभागी करून घेतलं असतं. मी अनेक माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये स्पष्ट नकार दिला आहे. त्यांना या तथाकथित लग्नाबद्दल विशेष फीचर कथा दाखवायची होती”, असं विपुल शाह पुढे म्हणाले.