रितेश-जिनिलियाचा फोटो पाहून राहुल गांधींनाही राहवलं नाही; राजीव-सोनिया गांधींची ती आठवण
रितेश देशमुखच्या मांडीवर बसून जिनिलिया डिसूझाने त्याला पिझ्झा भरवला. या रोमँटिक फोटोची तुलना नेटकऱ्यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रेमळ आठवणीशी केली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनीही हा फोटो शेअर केला आहे.

Riteish-Genelia Deshmukh: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा एक रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जिनिलिया चक्क रितेशच्या मांडीवर बसून त्याला पिझ्झा भरवताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोची तुलना नेटकऱ्यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या एका जुन्या आठवणीशी केली आहे. इतकंच नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोची चर्चा आणखी रंगली आहे.
काय आहे रितेश-जेनेलियाचा व्हायरल फोटो?
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघंही सोशल मीडिया वर एकमेकांसोबतचे मजेशीर आणि प्रेमळ क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच रितेशने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघंही एका रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र या फोटोतील खास गोष्ट म्हणजे जिनिलिया खुर्चीवर बसण्याऐवजी थेट रितेशच्या मांडीवर बसली आहे. ती स्वत:च्या हाताने रितेशला पिझ्झाचा घास भरवताना दिसते. या फोटोला रितेशने ‘Table for two, chair for one’ म्हणजेच दोन जणांसाठी टेबल, पण खुर्ची मात्र एकच, असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
पहा फोटो-
View this post on Instagram
रितेशच्या या पोस्टवर जिनिलियानेही भन्नाट कमेंट केली आहे. यातील जेवण नेमकं कोण आहे, याबाबत मी संभ्रमात आहे, असं तिने म्हटलं आहे. तिच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राजीव गांधी आणि सोनिया गांधींची आठवण का झाली?
रितेश-जिनिलियाचा हा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलेला एक किस्सा. 16 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली इथं सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी आई-वडिलांच्या नात्याबद्दल एक खास आठवण सांगितली होती. राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांच्या घरी जेवणाच्या वेळी वडील राजीव गांधी यांच्या मांडीवर आई सोनिया गांधी बसलेल्या असायच्या. लहानपणी त्यांना ही गोष्ट अगदी सामान्य वाटायची. मात्र, मित्रांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे आई-वडील अशा प्रकारे एकत्र बसत नसल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटायचं. त्यामुळे त्यांनी मित्रांनाही त्यांच्या आई-वडिलांबद्दल प्रश्न विचारले होते.
राहुल गांधींनीही शेअर केला रितेश-जिनिलियाचा फोटो

राहुल गांधी यांच्या या आठवणीची चर्चा सुरू असतानाच रितेश-जेनेलियाचा फोटो समोर आला. त्यामुळे नेटकऱ्यांनी दोन्ही घटनांमधील साम्य लगेच ओळखलं. अनेकांनी या फोटोवर ‘Belonging’ असा उल्लेख करत प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर रितेश-जिनिलिया ही राजीव-सोनिया गांधींची आजच्या काळातील जोडी असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनीही रितेशचा हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यासोबत शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाए’ हे गाणं जोडलं आहे. त्यामुळे या फोटोला आणखी प्रसिद्धी मिळाली आहे.
