‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकचे बाबा खलनायकानंतर बनणार सज्जन ‘पुरुषोत्तम’

गिरीश ओक यांची ‘दीपज्योती’ मधील ही सकारात्मक भूमिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. ही 'दीपज्योती' मालिका येत्या 13 एप्रिलपासून दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नॅशनल क्रश गिरीजा ओकचे बाबा खलनायकानंतर बनणार सज्जन पुरुषोत्तम
Girish Oak
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 10:09 AM

झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत आपली भूमिका गाजवल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आता ‘दीपज्योती’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानिमित्ताने गिरीश ओक यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल आणि मालिकेच्या अनुभवाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे पुरुषोत्तम गायकवाड. पुरुषोत्तमची साड्यांची बरीच दुकानं आहेत, त्याचा साड्यांचा व्यापार आहे आणि तो त्यांनी शून्यातून उभा केलेला आहे. त्याने ही संपत्ती, व्यवसाय, साम्राज्य खूप मेहनतीने उभं केलेल आहे आणि आता मुल हे सगळं सांभाळतील, असं त्याला वाटतंय. पुरुषोत्तम अतिशय तत्वनिष्ठ, सज्जन, कुठलाही वाईट व्यवहार न करणारा, मेहनतीने कमावणारा, सचोटीने वागणारा, लोकांना मदत करणारा, हळव्या मनाचा अशी त्याच्या भूमिकेची पार्श्वभूमी आहे. त्याची बायको जिवंत नाही, पण त्याच बायकोवर अतिशय प्रेम आहे,” असं ते सांगतात.

मालिकेसाठी निवडीबद्दल सांगताना गिरीश ओक पुढे म्हणाले, “मुंबईतल्या एका इव्हेंटला मला झी मराठी प्रोग्रामिंग हेड यांनी सांगितलं की आमची एक नवी मालिका येत आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी भूमिकेचा विचार केला आहे. त्यात तुमची एक सकारात्मक भूमिका आहे. आधी ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका मी करत होतो, त्यात माझी खलनायकाची भूमिका होती. आमचं रिडींग झालं, लूक टेस्ट झाली, पण मुळात हे सगळं होण्याआधीच माझी निवड या भूमिकेसाठी झालेली होती, याचा मला अंदाज आलेला. माझी आधीची भूमिका होती ती अतिशय निगेटिव्ह होती. अतिशय निर्दयी, गोर गरिबांचे हाल करणारा, बायकांवर अत्याचार करणारा, पैसे लुबाडणारा, स्वतःच्या परिवाराला वाईट वागवणारा. आताची भूमिका ही खूपच चांगली आहे. ‘दीपज्योती’ मालिकेत पुरुषोत्तम हा लोकांना मदत करणारा, दानशूर , घरीही खूप सज्जन, स्वताःच्या कामात व्यवहारात सुद्धा अतिशय प्रामाणिक, सुस्वभावी, सरळ मार्गाने जाणारा असा तो आहे.”

“मला अगदी नावाप्रमाणे भूमिका साकारायला मिळाल्या आहेत. चांगली व्यक्तिरेखा म्हणजेच पुरुषोत्तम आणि वाईट खलनायकाची भूमिका म्हणजे कर्दनकाळ जालिंधर असं मला वाटतं. शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगायचं झालं तर आम्ही शूटिंग करत होतो आणि आमच्या मेकअप आर्टिस्टने मला सांगितलं, की ज्या सेटवर इपी आहेत, त्यांनी मला विचारलं की गिरीश सरांनी लिपस्टिक लावली आहे का? सरांचे ओठ खूप लाल दिसतायत. हा किस्सा कळल्यानंतर मी पण थोडीशी गंमत म्हणून तिला कॉल केला. तेव्हा तीसुद्धा माझ्या गंमतिशीर स्वभावाच्या गोत्यात आलेली. मला हसत खेळत आनंदी वातावरणात काम करायला आवडतं. मान अपमान, अहंकार शक्यतो कामाच्या ठिकाणी कोणी करू नयेत, सगळ्यांनी छान मिळून मिसळून राहावं, काम करावं, अशा विचारांचा मी आहे”, असं मत गिरीश ओक यांनी मांडलं.

Follow Us