एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर अखेर गोविंदाने सोडलं मौन; पत्नीविषयी स्पष्टच म्हणाले..

विवाहबाह्य संबंधाच्या आरोपांवर अभिनेता गोविंदा पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाला आहे. पत्नी सुनीता अहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, पुन्हा एकदा गोविंदावर आरोप केले होते. त्यावर आता गोविंदाने काय प्रतिक्रिया दिली, ते सविस्तर वाचा..

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर अखेर गोविंदाने सोडलं मौन; पत्नीविषयी स्पष्टच म्हणाले..
Govinda
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 19, 2026 | 10:30 AM

अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चघळल्या जात आहेत. आता पुन्हा एकदा हे दोघं त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एकीकडे सुनीताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, 2025 हे वर्ष तिच्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी अत्यंत कठीण होतं. गोविंदाबद्दल ज्या चर्चा ऐकायला मिळत होत्या, त्यामुळे कोणीच खुश नव्हतं. वयाच्या 63 व्या वर्षी अशा गोष्टी त्यांच्याबद्दल ऐकायला मिळणं, चांगलं वाटत नाही. सुनीताच्या या मुलाखतीनंतर आता गोविंदाने या विषयावर अखेर मौन सोडलं आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा त्याच्याविषयीच्या या सर्व चर्चांवर मोकळेपणे व्यक्त झाला.

“माझ्याविरोधात कट..”

“मला असं वाटतं की, बहुतांश स्त्रिया चुकीच्या नसतात, मग माझी आई निर्मला देवी, माझी सासू असो किंवा माझ्या कुटुंबातील कोणतीही स्त्री असो.. मी कधीच त्यांच्याविरोधात जात नाही. माझ्या पत्नीने आता स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे, तर त्यावर ती विविध गोष्टींवर आपली मतं मांडत असते. माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की, गोविंदा तुझ्याविरोधात कट रचला जातोय, तेसुद्धा आता नाही तर बऱ्याच काळापासून. तर तू त्यातून कसा बाहेर पडशील? तर मी त्याला म्हटलं की, एक, दोन, चार-पाच किंवा 14-15 वर्षांपर्यंत आपण पूजा-प्रार्थना करतो, यज्ञ करतो. पण जेव्हा गोष्ट 14-15 वर्षांच्या पुढे जाते, तेव्हा मग तो योग नाही राहत, तो प्रयोग होतो. त्यामुळे जेव्हा एखाद्याने जाणूनबुजून केलेल्या कटात कुटुंबाचा समावेश होतो, तेव्हा लोक घाबरतात. पण हे सर्व गोविंदा नाही. मग थोडंसं वेगळेपण दिसून येतं,” असं तो म्हणाला.

“माझ्या कुटुंबीयांचा माझ्याविरोधात वापर..”

गोविंदा त्याची पत्नी सुनीताबद्दल पुढे म्हणतो, “पण मला वाटतं की ती खूप हुशार आहे, ती सुशिक्षित आहे. तिच्या भाषेत काहीही चूक नाही. पण गेल्या काही दिवसांपासून मी जे पाहतोय, ते म्हणजे जर कधीकधी आपण मौन बाळगलं, तर आपण कमकुवत दिसतो. लोकांना असं वाटतं की हो, हा वाईटच असेल. मी का बोलत नाही? असा प्रश्न लोकांना पडत असेल. तर त्याचं उत्तर मी आज देतोय. मला सांगण्यात आलं होतं की तुमच्या कुटुंबातील लोकांचा यामध्ये वापर केला जाऊ शकतो, पण त्यांना त्याबद्दल माहिती नसेल. एखाद्या व्यक्तीला आधी त्याच्या कुटुंबापासून आणि नंतर समाजापासून वेगळं करण्याच्या मोठ्या कटात त्यांचा वापर सुरुवातीचा बिंदू म्हणून केला जाऊ शकतो. मी इतक्या वर्षांपासून समाजापासून आणि माझ्या कामापासून वेगळा आहे. मला माझ्या चित्रपटांसाठी मार्केट सापडलेलं नाही आणि मला वाटत नाही की मी रडत बसतोय. मी अनेक चित्रपटही सोडले आहेत, म्हणूनच मी रडत नाही.”

फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांना दिला दोष

“ते म्हणतात की, तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही, तुम्हाला जे मिळतं ते नको आहे, मग घर कसं चालेल? महिलांचे दृष्टीकोन वेगवेगळे असतात. पण त्या कल्पनाही करू शकत नाही की तुम्हाला एका मोठ्या कटाच्या सुरुवातीलाच या वादात ढकललं गेलं आहे आणि मग समाजात तुमची बदनामी होते. एक सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखलं जावं आणि अशाच काही गोष्टीच ढकललं जावं. सुरुवातीला एका माणसाने माझ्यावर काही गंभीर आरोप करण्याचा प्रयत्न केला आणि तो उघडकीस आला. म्हणूनच जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत तुमची लोकप्रियता एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त होते, तेव्हा बरेच लोक लक्ष विचलित करणारे, अत्यंत अनपेक्षित गोष्टींसह बाहेर पडतात. ही प्रसिद्धी आणि संपत्ती तुम्हाला सोडत नाही,” अशा शब्दांत गोविंदा व्यक्त झाला.

पत्नी सुनीताने तुम्हाला तुमचं वर्तन सुधारण्याचा इशारा दिला होता, असं सांगितल्यावर गोविंदा हसला आणि म्हणाला, “बरं मला सांगा, मी किती वेळा लग्न केलं आहे? 40 वर्षे झाली आहेत, मी चार किंवा पाच वेळा लग्न केलं आहे का? ज्यांनी लग्न केलं आहे, त्यांच्या बायका काहीही बोलत नाहीत. त्या मोकळेपणे फिरतात, त्यांचं आयुष्य जगतात. फिल्म इंडस्ट्रीतील लोक अशा गोष्टींवर चर्चा करत नाहीत. मी अशा स्वच्छ प्रतिमेच्या ठराविक लोकांनाच पाहिलं आहे जे इतरांवर आरोप करू शकले आहेत.”