
बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत खटके उडाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुनीताने गोविंदावर थेट विवाहबाह्य संबंधाचा गंभीर आरोप केला आहे. इतकंच नव्हे वयाच्या 63 व्या वर्षी मुलाचं करिअर घडवण्याकडे, मुलीच्या लग्नाकडे लक्ष देण्याऐवजी गोविंदा अफेअरमध्ये गुंतल्याचं धक्कादायक वक्तव्य तिने केलं आहे. पत्नीच्य या सर्व आरोपांवर अखेर गोविंदाने आपली बाजू मांडली आहे. “मला एक सांगा, मी किती वेळा लग्न केलंय? माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. मी दोन-तीन लग्न केले आहेत का”, असा सवाल गोविंदाने केला.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा गोविंदाला सुनीताच्या आरोपांविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला, “मला एक सांगा, मी किती वेळा लग्न केलंय? माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. मी दोन-तीन वेळा लग्न केलंय का? जे लोक इतक्या वेळा लग्न करतात, त्यांच्या पत्नी याविषयी काहीच बोलत नाहीत. त्या मस्त फिरतात, मजा करतात. फिल्म इंडस्ट्रीत अशा गोष्टींचं गॉसिप केलं जात नाही. या इंडस्ट्रीत मी क्वचितच एखाद्याला निष्कलंक पाहिलंय.” यावेळी गोविंदाने असंही सांगितलं की त्याची पत्नी आणि पुतण्या कृष्णा अभिषेक यांचा त्याच्याविरुद्ध वापर केला जात आहे.
“कृष्णा अभिषेकचे टीव्ही शो पाहिलात तर लेखक त्याला माझा अपमान करणाऱ्या गोष्टी बोलायला लावतात. मी त्यालासुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की, माझा अपमान करण्यासाठी तुझा वापर केला जातोय, तू सावध राहा. जेव्हा मी कृष्णाला इशारा दिला, तेव्हा सुनीता चिडली. मला कळत नाही की हे लोक कधी एकमेकांवर रागावतात आणि कधी ठीक असतात. मी तर अत्यंत साधा माणूस आहे”, असं गोविंदाने स्पष्ट केलं.
गोविंदाने त्याच्या मुलाचं करिअर घडवायला मदत केली नाही, असाही आरोप सुनीताने केला होता. त्यावर उत्तर देताना गोविंदा म्हणाला, “मी माझ्या क्षमतेनुसार काम करतोय. मी निर्माते किंवा दिग्दर्शकांशी माझ्या मुलांबद्दल बोलत नाही. ही इंडस्ट्री माझं कुटुंब आहे. जिथे मी पैसा आणि प्रसिद्ध कमावतो, त्यामुळे मी तिला कलंकित करू इच्छित नाही. पण या इंडस्ट्रीत सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे, कारण या गोष्टी विनाकारण घडत नाहीत. एक कट रचला जातोय. लोक माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या आयुष्यात अशा समस्या निर्माण करू नका, ज्यामुळे मला आणि विशेषत: माझ्या कुटुंबाला दबावाखाली राहावं लागेल.”