मर्सिडीज-ऑडीवरून थेट टॅक्सीवर, गोविंदा दिवाळखोरीत? घर गहाण, पैशांसाठी शाळांमध्ये करतोय डान्स

अभिनेता गोविंदा आर्थिक संकटात असून पैशांसाठी तो विविध शाळा आणि छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करू लागल्याची चर्चा आहे. या चर्चांवर आता त्याच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदाने घर गहाण ठेवल्याचाही खुलासा त्याने केला आहे.

मर्सिडीज-ऑडीवरून थेट टॅक्सीवर, गोविंदा दिवाळखोरीत? घर गहाण, पैशांसाठी शाळांमध्ये करतोय डान्स
Govinda
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2026 | 11:05 AM

गेल्या काही काळापासून अभिनेता गोविंदा सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जवळपास वर्षभरापासून त्याच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असल्याचं म्हटलं जात आहे. आता एकेकाळी बॉलिवूड गाजवणारा गोविंदाच्या दिवाळखोरीच्याही चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच गोविंदा एका खाजगी कार्यक्रमात आणि एका कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसला. त्याला पैशांची गरज असल्याने तो अशा छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये नाचतोय, असं म्हटलं जाऊ लागलं. आता गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदाच्या सध्याच्या दिवाळखोरीच्या अफवा खोट्या असल्या तरी एकेकाळी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता आणि त्यासाठी त्याने राहतं घरसुद्धा गहाण ठेवलं होतं, याचा खुलासा सिन्हाने केला.

गोविंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला, ज्यामध्ये तो एका साध्या टॅक्सीमधून प्रवास करताना दिसला. गोविंदाचा पडता काळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या होत्या. एकेकाळी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज-बेंझसारख्या आलिशान आणि अत्यंत महागड्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या गोविंदावर आता टॅक्सीने फिरण्याची वेळ आल्याचं काहींनी म्हटलं होतं. या चर्चांवर मॅनेजर शशी सिन्हा म्हणाला, “गोविंदाचं खाजगी कार्यक्रम, शाळांमधील डान्स आणि टॅक्सीने प्रवास यांचा त्याच्या आर्थिक अडचणींशी काही संबंध नाही. गोविंदाकडे फक्त एकच नाही तर अनेक गाड्या आहेत. त्याच्या दिवाळखोरीच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. परफॉर्मन्स हा त्याचा बिझनेस आहे. त्यामुळे तो दिवाळखोरीत आहे असा अर्थ होत नाही. त्यावेळी विमानतळावर खाजगी वाहनांना परवागनी नव्हती. तो अजूनही त्याच्या पत्नी आणि मुलांची काळजी घेतो.”

“गोविंदाने गेल्या काही वर्षांत एकही चित्रपट केलेला नाही. तरीही त्याला विविध कार्यक्रमांमध्ये डान्स परफॉर्मन्ससाठी सतत बोलावलं जातं. चित्रपटांसाठीही त्याला अनेकदा विचारलं गेलं आहे. त्याने कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स नाकारल्याचा साक्षीदार मी आहे. कधी त्याला पटकथा आवडली नाही तर कधी आणखी काही कारण होतं. परंतु तो पहिला असा अभिनेता आहे, ज्याचा इतक्या वर्षांत एकही हिट चित्रपट नसला तरी मोठमोठे निर्माते आणि अभिनेते अजूनही त्याच्या मागे धावतात. याचा अर्थ असा होत नाही की त्याने काम करणं थांबवलं आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.

यावेळ शशी सिन्हाने गोविंदाच्या आर्थिक अडचणींबद्दलही खुलासा केला. तो पुढे म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा गोविंदाने त्याच्या मुदत ठेवीतून पैसे काढले होते. त्यापैकी काही पैसे त्याने भरले आणि काही इतरांना मदत करण्यासाठी वापरले होते. नंतर परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याला त्याचं घर गहाण ठेवावं लागलं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी तो विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिला आणि काही ठिकाणी परफॉर्मसुद्धा केलं. आम्ही कधीही याबद्दल चर्चा केली नाही आणि त्याने कधीच कोणाकडे पैशांसाठी हात पसरले नाहीत. “