
Govinda : अभिनेता गोविंदाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. आपल्या अभिनयाने, स्टाइलने आणि डान्सने त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. गोविंदाने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत आहे. पत्नी सुनिता अहुजा त्याला घटस्फोट देणार असल्याची जोरदार चर्चा होती. या सर्व चर्चांदरम्यान गणेशोत्सव काळात गोविंदा आणि सुनिता पुन्हा एकदा एकत्र दिसले. आता गोविंदा त्याच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदा नव्या लूकमध्ये दिसतोय. त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
एका पापाराझी अकाऊंटवर गोविंदाचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदा त्याच्या खास अंदाजात दिसतोय. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, डेनिम जीन्स आणि त्यावर पिवळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे. गोविंदाच्या अनोख्या स्टाइलने सर्वांचं लक्ष वेधलंय. विशेष म्हणजे गोविंदाने बरंच वजनसुद्धा कमी केल्याचं दिसतंय. तो आधीपेक्षा अधिक फिट दिसतोय. गोविंदाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘द ओरिजिनल इज बॅक’ असं एकाने लिहिलंय. तर ‘बॉलिवूडमधील गोविंदाचा काळ खरंच जबरदस्त होता’ असं दुसऱ्याने म्हटलंय.
गोविंदाने आतापर्यंतच्या करिअरमध्ये 165 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. नव्वदच्या दशकात त्याने एकानंतर एक सुपरहिट चित्रपटे दिली आहेत. ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर 1’, ‘साजन चले ससुराल’, ‘हिरो नंबर 1’, ‘दुल्हे राजा’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘अनाडी नंबर 1’, ‘हसीना मान जाएगी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘जोडी नंबर वन’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.
गेल्या काही काळापासून गोविंदा त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. एका मराठी अभिनेत्रीसोबत त्याच्या अफेअरच्याही चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर त्याची पत्नी सुनिता त्याच्यापासून वेगळी राहत असल्याचंही म्हटलं गेलं. सुनिताने विविध मुलाखतींमध्ये यावर प्रतिक्रिया दिली आहे. परंतु त्यात तिने घटस्फोट घेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सुनिता आणि गोविंदा यांनी 1987 मध्ये लग्न केलं. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून अहुजा हे आडनाव काढून टाकलं होतं. डिसेंबर 2024 मध्ये सुनिताने वांद्रे कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता, असं वृत्त ‘हॉटरफ्लाय’ या वेबसाइटने दिलं होतं. यावेळी तिने गोविंदावर व्यभिचार, क्रूरता असे गंभीर आरोप केले होते.