धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची अत्यंत भावूक पोस्ट

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. धरमजींच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी शेवटच्या श्वासापर्यंत राहील, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची अत्यंत भावूक पोस्ट
Dharmendra and Hema Malini
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2025 | 11:38 AM

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. धर्मेद्र यांच्यासोबतच्या खास आठवणीही त्यांनी फोटोंच्या रुपात शेअर केल्या आहेत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु कुटुंबीयांच्या आग्रहाखातर त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि त्यानंतर घरीच उपचार सुरू ठेवले. परंतु सोमवारी सकाळी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर आता हेमा मालिनी यांनी ही पोस्ट लिहिली आहे.

हेमा मालिनी यांची पोस्ट-

धरमजी.. माझ्यासाठी ते बरंच काही होते. प्रेमळ पती, ईशा आणि अहाना या आमच्या दोन मुलींचे प्रेमळ वडील, मित्र, तत्वज्ञानी, मार्गदर्शक, कवी, गरजेच्या वेळी ज्यांच्याकडे हक्काने जाता येईल अशी व्यक्ती.. किंबहुना ते माझ्यासाठी सर्वस्व होते. चांगल्या आणि वाईट काळात त्यांनी कायम माझी साथ दिली. त्यांनी त्यांच्या साध्या, मैत्रीपूर्ण वागण्याने माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रिय बनवलं होतं. ते नेहमीच सर्वांमध्ये प्रेम आणि रस दाखवायचे’, असं त्यांनी लिहिलं आहे.

‘एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिभा, लोकप्रियता प्रचंड असूनही त्यांच्या नम्र आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते इतर दिग्गजांपेक्षा वेगळे, अतुलनीय आणि अद्वितीय ठरले. चित्रपटसृष्टीतील त्यांची शाश्वत किर्ती आणि कामगिरी चिरकाल टिकून राहील’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

‘माझं वैयक्तिक नुकसान शब्दांत मांडता येणार नाही आणि त्यांच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी माझ्या उर्वरित आयुष्यात कायम राहील. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर माझ्याकडे त्यांच्यासोबतचे असंख्य क्षण आहेत, जे मला आठवणींमधून पुन्हा जगता येतील’, असं त्यांनी पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.

प्रचंड लोकप्रियता मिळूनही धर्मेंद्र यांच्या स्वभावात किंचितही फरक पडला नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते प्रत्येक लहानमोठ्या माणसाठी प्रेमाने वागले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वगुणसंपन्न अभिनेते म्हणून ते नावाजले होते. अतिशय मनमिळाऊ, सगळ्यांना सांभाळून घेणारा, श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाशी तितक्याच मायेनं वागणारा माणूस म्हणून ते ओळखले जायचे. धर्मेंद्र कायम आपल्या तत्त्वांना धरून राहिले आणि ते नेहमीच त्याविषयी खुलेपणाने बोलत असत. त्यांनी कायम मातीशी नाळ जोडून ठेवली होती.