पुण्यातल्या मावळमधल्या ‘या’ गावाशी धर्मेंद्र यांचं का आहे खास नातं? पाणावले ग्रामस्थांचे डोळे
धर्मेंद्र यांचं पुण्यातल्या मावळ तालुक्यातील या गावाशी खास नातं होतं. म्हणून त्यांच्या निधनानंतर इथल्या ग्रामस्थांनी त्यांच्या फार्महाऊससमोर अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी मुंबईत वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह देशभरात शोककळा पसरली आहे. सोमवारी विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त होतोय. अशातच मावळ तालुक्यातील औंढे इथल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. धर्मेंद्र यांनी गेली 25 वर्षे औंढे इथल्या त्यांच्या फार्महाऊसवर शेती केली होती. त्यामुळे या गावातील प्रत्येक कुटुंबाशी त्यांचा जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा संबंध जुळला होता. ग्रामस्थांनी धर्मेंद्र यांच्या याच फार्महाऊससमोर श्रद्धांजली अर्पण केली आहे.
धर्मेंद्र अत्यंत साधे, प्रेमळ आणि गावाशी निष्ठेने जोडलेले होते, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. औंढे ग्रामस्थांनी एकत्र येऊन धर्मेंद्र यांच्या फार्महाऊससमोर त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी अनेकांनी त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावाच्या आणि गावातील दैनंदिन आयुष्यातील सहभागाच्या आठवणी सांगितल्या. गावात त्यांच्या निधनाने शोककळा पसरली असून, “धर्मेंद्रजी गावातील आपलेच होते,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
प्रचंड लोकप्रियता मिळूनही धर्मेंद्र यांच्या स्वभावात किंचितही फरक पडला नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते प्रत्येक लहानमोठ्या माणसाठी प्रेमाने वागले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वगुणसंपन्न अभिनेते म्हणून ते नावाजले होते. अतिशय मनमिळाऊ, सगळ्यांना सांभाळून घेणारा, श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाशी तितक्याच मायेनं वागणारा माणूस म्हणून ते ओळखले जायचे. धर्मेंद्र कायम आपल्या तत्त्वांना धरून राहिले आणि ते नेहमीच त्याविषयी खुलेपणाने बोलत असत. त्यांनी कायम मातीशी नाळ जोडून ठेवली होती. त्यामुळे कितीही लोकप्रिय कलाकार म्हणून नावारुपाला आले तरी त्यांच्या वागण्यात जराही बदल झाला नसल्याचं अनेकजण सांगतात. थर्मेंद्र यांनी 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी स्वत:ला हिंदी चित्रपटसृष्टीचा यशस्वी नायक म्हणून प्रस्थापित केलं. त्यामुळे त्यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
