तुझ्या पतीने इस्लाम स्वीकारला का? हिंदूशी लग्न करणाऱ्या हिना खानवर प्रश्नांचा भडीमार

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलंय. परंतु या आंतरधर्मीय लग्नावरून काही नेटकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे. हिनाशी लग्न करण्यासाठी रॉकीने इस्लाम धर्म स्वीकारला की काय, असा प्रश्न केला आहे.

तुझ्या पतीने इस्लाम स्वीकारला का? हिंदूशी लग्न करणाऱ्या हिना खानवर प्रश्नांचा भडीमार
Hina Khan and Rocky Jaiswal
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2025 | 8:51 AM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. बुधवारी संध्याकाळी तिने सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो पोस्ट केले. गेल्या काही काळापासून हिना ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. अशातच तिने छोटेखानी समारंभात हे लग्न उरकलंय. हिना आणि रॉकी गेल्या बारा-तेरा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांनी आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. हिनाने पोस्ट केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा वर्षाव केला आहे. परंतु यात असेही काही जण आहेत, ज्यांनी आंतरधर्मीय लग्नावरून टीकासुद्धा केली आहे. हिना मुस्लीम आहे तर रॉकी हिंदू आहे. त्यामुळे रॉकीने हिनाशी लग्न करण्यापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला की काय, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.

लग्नाच्या फोटोंवर एकाने कमेंट केलं, ‘उमरा किंवा नमाज काय कामाचे, जर तुला हिंदूशीच लग्न करायचं होतं?’ तर दुसऱ्याने सवाल केला, ‘तुझ्या बॉयफ्रेंडने तुझ्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला का? कारण जोपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारत नाही, तोपर्यंत लग्न होऊ शकत नाही असं कुराणमध्ये म्हटलंय ना?’ काहींनी हिनालाही ट्रोल केलंय. ‘मुस्लीम असून हिंदू मुलाशी लग्न केलंस. तुझ्या आईने तुला योग्य शिकवण दिली नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

हिना खानच्या फोटोंवरील कमेंट्स

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवर हिना आणि रॉकीची पहिली भेट झाली होती. या मालिकेत हिना मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी हा त्याचा निर्माता होता. याच मालिकेत एकत्र काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. हिना खानच्या चांगल्या-वाईट काळात रॉकीने तिची खंबीर साथ दिल्याचं पहायला मिळालं. गेल्या वर्षी जून महिन्यात तिने ब्रेस्ट कॅन्सर निदान झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आयुष्यातील या सर्वांत कठीण काळात रॉकीने तिला पाठिंबा दिला. हळूहळू हिना त्यातून बरी होत असल्याचं पहायला मिळत आहे.

कलाकारांना आंतरधर्मीय लग्नावरून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावरही याच कारणामुळे निशाणा साधण्यात आला होता. सोनाक्षीने मुस्लीम अभिनेता झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलंय.