हिना खान कॅन्सरग्रस्त असल्याचं माहीत असतानाही रॉकीने तिच्याशी का लग्न केलं? कारण वाचून तुम्हीही कराल त्याचं कौतुक
अकरा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलं. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिनाला 2024 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.

दोन वेगवेगळ्या जगातून आम्ही एकमेकांसाठी प्रेमाचं विश्व निर्माण केलं. आमच्यातील मतभेद पुसले गेले, आमची अंत:करणं एकरुप झाली अन् आयुष्यभरासाठी एक बंधन निर्माण झालं.. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत अभिनेत्री हिना खानने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जवळपास अकरा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलंय. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांनी लग्न केलं असून त्याचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. तिच्या आयुष्यातील या सर्वांत कठीण आणि आव्हानात्मक काळात रॉकीने तिची खूप साथ दिली. हिनाच्या आजारपणाविषयी समजल्यानंतरही रॉकीने कधीच पाऊल मागे घेतलं नाही. उलट त्याने प्रत्येक पावलावर हिनाला खंबीर पाठिंबा दिला. म्हणूनच त्याचं चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.
हिनाच्या कॅन्सरबद्दलही समजल्यानंतर लग्नाचा निर्णय कायम असेल का, असा प्रश्न रॉकीला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “आमचं नातं इतकं कमकुवत नाही की ते अशा अडथळ्यांमुळे तुटेल. जोपर्यंत हिना पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत मी तिची प्रतीक्षा करेन. मला लग्नाची काहीच घाई नाही. हिना कॅन्सरमुक्त व्हावी, ती पूर्णपणे बरी व्हावी, याला माझं प्राधान्य आहे. आम्ही चांगल्या-वाईट काळात एकमेकांसोबत कायम होतो आणि यापुढेही राहू.” रॉकीने दिलेलं हे उत्तर आता त्यांच्या लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नेटकरी रॉकीचं तोंडभरून कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
हिना आणि रॉकी यांची पहिली भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. हिना या मालिकेत मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी या मालिकेचा निर्माता होता. हिनाने जून 2024 मध्ये तिला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. तिच्यावर सर्जरी आणि किमोथेरपी पार पडली. कॅन्सरशी झुंज देण्याचा हा संपूर्ण प्रवास ती सोशल मीडियाद्वार चाहत्यांसोबत सतत शेअर करत होती. किमोथेरेपी सुरू करण्यापूर्वी हिनाने तिचे केससुद्धा कापले. किमोथेरेपीमुळे केस गळतात. त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले. त्याचा व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हिनाला पाहून तिची आई भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसलं होतं.
