लग्नाच्या 19 दिवसांतच हिना – रॉकीमध्ये भांडण; पैशांवरून किरकिर, पतीवर का वैतागली अभिनेत्री?
लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच हिना खान आणि तिचा पती रॉकी जयस्वाल यांच्यात खटके उडू लागले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिना आणि रॉकीच्या भांडणाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानने नुकतंच बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलं. काही दिवसांपूर्वी या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतरही रॉकी तिची खूप साथ दिली होती. आयुष्यातील या कठीण काळाला एकत्र सामोरं गेल्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या लग्नाला अवघे 20 दिवससुद्धा पूर्ण झाले नाहीत. परंतु त्याआधीच त्यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. या वादाचा व्हिडीओ हिनाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
हिना आणि रॉकी यांच्यात पैशांवरून वाद झाला आहे. परंतु हा वाद काही गंभीर नाही. उलट हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल. हिनाने पती रॉकीसोबत लिपसिंकचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये हिना रॉकीकडे पैसे मागताना दिसतेय. परंतु पैसे हा शब्द ऐकताच रॉकी गाणं गाऊन उत्तर देतो की, “कुछ ना कहो.. कुछ भी ना कहो.” हे ऐकून हिना वैतागते आणि ती पतीला म्हणते, “आप तो सुनते ही नहीं हो.” त्यावर रॉकी पुन्हा गाण्याच्या पुढच्या ओळी म्हणतो, “क्या सुनना है..”
View this post on Instagram
या व्हिडीओत हिना पुढे म्हणते, “मला मेकअप विकत घ्यायचं आहे, मी चेटकीणसारखी दिसतेय.” हे ऐकून रॉकी म्हणतो, “सबको पता है..” दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन करतोय. लग्नानंतर हिना आणि रॉकीचं हसतं-खेळतं नातं पाहून चाहतेसुद्धा खुश झाले आहेत. हे दोघं लवकरच कलर्स टीव्हीच्या ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये झळकणार आहेत. या शोचा प्रोमोसुद्धा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हिना खानला गेल्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी झाली. किमोथेरपीदरम्यान हिनाच्या प्रकृतीवर बराच परिणाम झाला होता. तिने तिचे केससुद्धा कापले होते. आता हळूहळू या सर्व गोष्टींमधून ती सावरत असून त्यात रॉकीची तिला खंबीर साथ मिळत आहे. कॅन्सरशी लढा देण्याच्या या संपूर्ण प्रवासात रॉकी तिच्या बाजूने कायम उभा होता. हिना आणि रॉकी यांची भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. या मालिकेत हिना मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी निर्माता होता.
