अमिताभ बच्चन यांना कसं झेलतात? चिडलेल्या जया बच्चन यांच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर चिडतानाचा जया बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अमिताभ बच्चन यांना कसं झेलतात, असा उपरोधिक सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

अमिताभ बच्चन यांना कसं झेलतात? चिडलेल्या जया बच्चन यांच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Amitabh and Jaya Bachchan
Image Credit source: ANI
| Updated on: Aug 13, 2025 | 12:51 PM

ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांना पुन्हा एकदा चिडल्याचं पहायला मिळालं. सेल्फी क्लिक करण्यासाठी जवळ आलेल्या चाहत्याला धक्का देत त्यांनी राग व्यक्त केला. संसदेच्या आवारातच ही घटना घडली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. जया बच्चन यांना याआधीही अशाच प्रकारे चिडताना पाहिलं गेलंय, परंतु आता ज्याप्रकारे त्यांनी चाहत्याला धक्का दिला आणि त्याला वागणूक दिली, ते अनेकांना पटलं नाही. सेल्फी घेण्यापूर्वी परवानगी विचारणं गरजेचं असलं तरी जया बच्चन यांनी अशी वागणूक द्यायला हवी नव्हती, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे. इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चन यांना कसं झेलतात, असा सवाल काहींनी केला आहे.

जया बच्चन यांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. ‘बिग बींना सर्वांत संयमी पतीचा पुरस्कार मिळाला पाहिजे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘मी अमिताभ बच्चन यांना न्याय मिळावा अशी मागणी करतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी तर थेट त्यांच्या अटकेचीच मागणी केली आहे. सेल्फी घेणऱ्या व्यक्तीने त्यांना स्पर्शसुद्धा केला नव्हता, त्यांनी अशा पद्धतीने ढकलणं चुकीचंच आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे.

पहा व्हिडीओ

या व्हिडीओवर केवळ सर्वसामान्यांच्याच नाही तर सेलिब्रिटींच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीसुद्धा पोस्ट लिहित जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे. ‘सर्वाधिक बिघडलेली आणि विशेषाधिकार मिळालेली महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही,’ असं त्यांनी लिहिलंय. तर दिग्गज निर्माते अशोक पंडित यांनीसुद्धा जया बच्चन यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे. ‘जया बच्चन यांचं हे असं वागणं अत्यंत निषेधार्ह आणि त्यांना निवडून देणाऱ्या लोकांसाठी अपमानास्पद आहे. जनतेच्या सेवकाने 24 तास असं चिडलेलं राहू नये. त्यांच्यासारख्या कलावंताकडून लोकांना नम्रता आणि करुणेची अपेक्षा आहे,’ असं मत त्यांनी मांडलं आहे.