
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने आज हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली असली तरी इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत ‘दोस्ताना’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. तरुण मनसुखानीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि शूटिंगदरम्यान अनेकदा प्रियांकाचे त्याच्यासोबत मतभेद झाले होते. तरीसुद्धा तरुणच्या भीतीपोटी प्रियांका तापाने फणफणत असतानाही शूटिंगला जाण्याचा हट्ट आईकडे केला होता. तेव्हा आईने तिला घरी आराम करण्यास सांगून दिग्दर्शकाला फोन केला. प्रियांकाच्या तब्येतीविषयी सांगितल्यानंतर तरुणने उपरोधिक प्रतिक्रिया दिली असता मधू चोप्रा यांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं.
‘लेहरें रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत मधू चोप्रा म्हणाल्या, “आज मी ज्या तरुणला ओळखते, तो पूर्वी तसा अजिबात नव्हता. सेटवर त्याला सर्वजण घाबरायचे. एकेदिवशी प्रियांकाला खूप ताप होता. मी तिला गोळी दिली, तरीसुद्धा तिचा ताप काही कमी होत नव्हता. अशा अवस्थेतही ती शूटिंगला जायला निघत होती. पण मी तिला ओरडून घरी आराम करायला सांगितलं. तेव्हा तरुणच्या भीतीने तिने मलाच कॉल करून त्याला शूटिंगला येत नसल्याचं सांगायला म्हटलं.”
“प्रियांकाला ताप आल्याने ती शूटिंगला येऊ शकणार नाही, असं मी तरुणला फोनवरून कळवलं. त्यावर तो उपरोधिकपणे म्हणाला, किती सोयीस्कर कारण आहे हे. मीसुद्धा शांत बसले नाही. मी त्याला म्हणाले, जर प्रियांकाने तुझ्या सेटवर मरावं अशी इच्छा असेल तर मी तिला पाठवते. पण जर तिला काही झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी तुझी असेल. आता इतक्या वर्षांनंतर आम्ही चांगले मित्र आहोत. आता मी कधी तरुणला भेटले तर माझ्याच या डायलॉगने मी त्याला चिडवते, की प्रियांकाला सेटवर पाठवू का?”
प्रियांकानेही याआधी एका मुलाखतीत सेटवरील भयानक अनुभव सांगितला होता. दिग्दर्शकाचं म्हणणं ऐकल्यानंतर चित्रपटातून माघार घेतल्याचा खुलासा तिने ‘फोर्ब्स’ मासिकाच्या कार्यक्रमात केला होता. “दिग्दर्शक फोनवर एकाला सांगत होता की, जेव्हा ती तिची पँटी दाखवेल, तेव्हाच लोक थिएटरमध्ये तिला बघायला येतील. त्यामुळे तिचा स्कर्ट एकमद शॉर्ट ठेवा. समोर बसलेल्यांना तिची पँटी दिसली पाहिजे. असं तो चार वेळा म्हणाला. हिंदी भाषेत त्याने याहून घाण शब्द वापरले होते”, असं प्रियांका म्हणाली.