Imran Khan : आयुष्यात कधीच आंदोलनाला जाणार नाही…भारत छोडो नोटिशीवर इमरान खानाने कोर्टापुढे मागितली माफी!
मुंबईत झालेल्या आंदोलना दरम्यान अभिनेता इमरान खान याला पोलिसांनी अटक केली होती. FRRO ने त्याला भारत सोडण्याची नोटीस बजावली होती. त्यावर इमराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला माफी मागायला लावली.

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान सध्या कोर्टाच्या कचाट्यात सापडला आहे. मुंबईत एका आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशी विरूद्ध इमरान खानने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. दरम्यान नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान त्याने न्यायालयाची माफी मागत,कोणत्याही आंदोलनात सहभागी न होण्याचं आश्वासन दिलं आहे.
इमरान खान हा अमेरिकन नागरिक असून त्याच्याकडे भारतात राहण्यासाठी ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया म्हणजेच ओसीआय कार्ड आहे. 10 ऑक्टोबर रोजी मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू होतं. देशातील मतदारयादयांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेला म्हणजेच (SIR ) ला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी इमरान खानला ताब्यात घेतलं होतं. यानंतर 14 ऑक्टोबर रोजी त्याला FRRO कडून त्याला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली. या नोटीशीनुसार त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर इमरान याने या नोटीसीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
2 नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठन यांच्या खंडपीठासमोर सुनवणी झाली. गेल्या आठवड्यात या नोटीसला स्थगिती मिळाली.सुनावणीदरम्यान, इम्रान खानचे ज्येष्ठ वकील, व्यंकटेश धोंड यांनी याचिकेचा हवाला देत असा युक्तिवाद केला की, अभिनेत्याचा कोणत्याही आंदोलक संघटनांशी नाही. तो म्हणाला, ‘माझी चौकशीही झालेली नाही आणि मला बोलावण्यातही आलेले नाही. सर्व कलमे जामीनपत्र आहेत.
राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायलयाला माहिती दिल्याप्रमाणे या प्रकरणात FIR दाखल करण्यात आला आहे. FRRO चे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे सादर करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. अनिल सिंग पुढे म्हणाले की, ‘याचिकार्त्याचा इमरान खानचा दावा आहे की आंदोलनाशी त्याचा काहीही संबंध नाही पण त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि अपलोड केलेली सामग्री पाहा. त्याने एक मुलाखतही दिली होती. ज्याचा त्याने याचिकेत समावेश केलेला नाही. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोवर्स आहेत.
इमरान खानच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ‘माझ्याकडे माझ्या अमेरिकन पासपोर्टची आणि ओसीआय कार्डची प्रत आहे. माझा जन्म अमेरिकेत झाला, त्यामुळे माझ्याकडे तिथले नागरिकत्व आहे. पण मी माझे संपूर्ण आयुष्य भारतात घालवले आहे. आधी माझ्याकडे PIO कार्डही होते. मी भारतातच माझं बालपण घालवलं, मी इकडेच लग्न केले आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये कामही केले. वकिल पुढे म्हणाले, ‘मी यापुढे कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही, असे न्यायालयाला लेखी आश्वासन देण्यास तयार आहे.
या प्रकरणी खंडपीठाने म्हटले की, ‘आरोप अत्यंत गंभीर आहेत. तुम्ही ओसीआय कार्डधारक आहात आणि भारतीय नागरिकाप्रमाणे वागू शकत नाही. तुम्हाला इथल्या घटनांविरोधात भाष्य करण्याचा कोणाताही अधिकार नाही. तुम्हाला आंदोलनात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार नव्हता. तुम्ही आंदोलनात सामील झालात, आंदोलनाला चिघळवले त्यासाठी तुम्हाला माफी देखील मागावी लागेल. यानंतर इमारन खानचे वकिल धोंड यांनी मुंबई न्यायालयाकडे हमीपत्रासोबतच बिनशर्त माफीनामा देखील सादर केला आहे. यासंबंधीत पुढील सुनावणी 7 डिसेंबर रोजी होणार आहे.
