India vs Pak: टीम इंडियाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी पाकिस्तानी क्रिकेटरला केलं ट्रोल, पोस्ट वाचून तुम्हीही हसाल!

India vs Pak : भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. भारताने नवव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला आहे. त्याचसोबत या टुर्नामेंटमध्ये भारताने एक-दोन नाही तर तीन वेळा पाकिस्तानच्या संघाला हरवलं आहे. या विजयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

India vs Pak: टीम इंडियाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी पाकिस्तानी क्रिकेटरला केलं ट्रोल, पोस्ट वाचून तुम्हीही हसाल!
बिग बींचा पाकिस्तानी क्रिकेटरला टोला
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2025 | 9:11 AM

India vs Pak : क्रिकेटची कोणतीही टुर्नामेंट असली तरी जेव्हा कधी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना असतो, तेव्हा मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळतोच. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही असंच काहीसं पहायला मिळालं. आधीच दोन वेळा भारताने पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली होती आणि अंतिम सामन्यातही काही वेगळं पहायला मिळालं नाही. भारताने अत्यंत सहजतेने पाकिस्तानला हरवलं आणि 41 वर्षांच्या इतिहासात नवव्यांदा आशिया कप आपल्या नावे केला. या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हेसुद्धा क्रिकेटप्रेमी आहेत. भारताच्या विजयानंतर टीमला शुभेच्छा देताना त्यांनी एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरची आपल्याच अंदाजात फिरकी घेतली. बिग बींची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने अभिषेक शर्माचा उल्लेख चुकून अभिषेक बच्चन असा केला होता. याचं उत्तर त्यावेळी अभिषेकनेही दिलं होतं. परंतु आता आशिया कप जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी शोएब अख्तरला ट्रोल केलं आहे. बिग बींनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत लिहिलं, ‘अभिषेक बच्चन खूप चांगला खेळला. तिथे जीभ अडखळली आणि इथे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग न करताच शत्रूला अडखळवलं. जय हिंद, जय भारत, जय माँ दुर्गा.’ या पोस्टमध्ये बिग बींनी जाणूनबुजून अभिषेक शर्माचा उल्लेख अभिषेक बच्चन असा केला. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बिग बींची पोस्ट-

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात ते जल्लोष करताना दिसत आहेत. त्याचसोबत ‘भारत माता की जय’ असा जयघोष ते करत आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंह, विकी कौशल यांसारख्या सेलिब्रिटींनीही टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीनंतर तिलक वर्माने साकारलेल्या झुंजार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला आणि आशिया चषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.