अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा, पत्नी शुरा प्रेग्नंट? नेमकं काय आहे सत्य?
अभिनेता अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शुरा खानला मुंबईतील एका रुग्णालयात पाहिलं गेलं. त्यानंतर हे दोघं लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यामागचं नेमकं सत्य काय आहे, ते जाणून घेऊयात..

अभिनेता अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शुरा खान यांना मंगळवारी मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं. पापाराझींनी या दोघांचा व्हिडीओ शूट केला आणि नंतर सोशल मीडियावर पोस्ट केला. अरबाज-शुराचा हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यावेळी अरबाजच्या हातात मेडिकल हिस्ट्रीची फाइल होती आणि शुराने ढगळे कपडे परिधान केले होते. त्यामुळे ती प्रेग्नंट असून बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत दोघांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. अरबाज लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. परंतु यामागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज आणि शुरा हे मॅटर्निटी क्लिनिकला गेले नव्हते. तर ते डॉ. राकेश सिन्हा यांच्या वुमन हॉस्पिटल, फायब्रॉइड क्लिनिकला गेले होते. डॉ. राकेश सिन्हा आणि डॉ. मंजू सिन्हा यांना फायब्रॉइड आणि युटेरस रिमूव्हलमधील त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळाले आहेत. परंतु अरबाज आणि शुराच्या रुग्णालयाला जाण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र चाहत्यांना इतक्यात काही गुड न्यूज मिळणार नाही, हे मात्र स्पष्ट झालं आहे.
View this post on Instagram
अरबाज आणि शुराने डिसेंबर 2023 मध्ये निकाह केला होता. बहीण अर्पिता खानच्या घरातच हा निकाह पार पडला होता. ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीची मेकअप आर्टिस्ट आहे. अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे.
लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे, याविषयी अरबाजला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “मी खूप खुश आहे. पत्नीला ओळखू लागल्यापासून मी बराच शांत आणि एकाग्र झालोय. शुराला डेट करत असल्यापासून आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि हा बदल सकारात्मकच होता.” शुराला भेटल्यापासून मी स्वत:विषयी अधिक आत्मविश्वासू झालोय, असंही अरबाज या मुलाखतीत म्हणाला होता.
