खिशात फक्त 27 पैसे घेऊन आलेला हा गायक, स्टेशन, फुटपाथवर झोपून घडवला यशाचा प्रवास
खिशात फक्त 27 पैसे घेऊन मुंबईत आलेला हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक. परिस्थिती इतकी बिकट की रेल्वे स्टेशनवर काढले दिवस. सलग तीन दिवस मिळाले नाही जेवण. कोण आहे तो गायक?

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि शायर जावेद अख्तर यांनी आपल्या कारकिर्दीत मोठं यश मिळवलं. मात्र, हे यश मिळवण्यापूर्वी त्यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. जावेद अख्तर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांतील आठवणींना उजाळा देत एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शबाना आझमी यांनी सांगितल्यानुसार, 4 ऑक्टोबर 1964 रोजी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी जावेद अख्तर मुंबईतील बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर दाखल झाले होते. त्यांच्या खिशात त्यावेळी केवळ 27 पैसे होते; मात्र डोळ्यांत मोठी स्वप्नं होती. मुंबईत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आलेल्या जावेद अख्तर यांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
फुटपाथवर काढल्या रात्री
मुंबईत राहण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःची जागा नव्हती. त्यामुळे अनेक रात्री त्यांनी फुटपाथवर काढल्या. काही वेळा रेल्वे स्टेशन किंवा वेगवेगळ्या स्टुडिओंच्या परिसरातही त्यांनी आसरा घेतला. परिस्थिती इतकी कठीण होती की, एक वेळ अशी आली होती जेव्हा जावेद अख्तर सलग तीन दिवस काहीही खाऊ शकले नव्हते.
त्यांच्याकडे कपडेही फार कमी होते आणि जे होते त्यांची परिस्थितीही खराब होती. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. निराशेच्या टोकावर पोहोचल्यावरही त्यांनी स्वतःला धीर दिला आणि एक दिवस परिस्थिती नक्की बदलेल असा विश्वास मनात कायम ठेवला.
‘सलीम-जावेद’ जोडीने बदललं हिंदी सिनेमाचं चित्र
जावेद अख्तर यांनी पुढे भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सलीम खान यांच्यासोबत त्यांची जोडी ‘सलीम-जावेद’ म्हणून प्रचंड गाजली. 1970 आणि 1980 च्या दशकात या जोडीने ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘डॉन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांची पटकथा आणि संवाद लिहिले. या चित्रपटांनी हिंदी सिनेमातील कथाकथनाला नवी दिशा दिली.
यानंतर जावेद अख्तर यांनी गीतकार आणि शायर म्हणूनही आपला ठसा उमटवला. त्यांच्या लेखणीतून अनेक लोकप्रिय आणि अविस्मरणीय गाणी जन्माला आली. त्यामुळे आज भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक आणि गीतकार म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी 9 डिसेंबर1984 रोजी विवाह केला. खिशात अवघे 27 पैसे घेऊन मुंबईत आलेल्या जावेद अख्तर यांचा हा संघर्षमय प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.