
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या चिडक्या स्वभावामुळे चर्चेत आल्या आहेत. दिल्लीत संसदेच्या आवारात जेव्हा एक व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी आली, तेव्हा जया बच्चन यांनी त्यांना जोरात धक्का दिला आणि ओरडल्या. त्यांचं हे वागणं अनेकांना खटकलं असून त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सर्वसामान्य नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा जया बच्चन यांच्या अशा वागण्याचा निषेध व्यक्त करत आहेत. जया बच्चन नेहमीच इतक्या चिडलेल्या का असतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच त्यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे, ज्यामध्ये खुद्द त्यांनीच यामागचं कारण सांगितलं होतं.
नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “जे लोक तुमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि त्याचंच प्रॉडक्ट बनवून विकण्याचा प्रयत्न करून त्यावर आपलं पोट भरू इच्छितात, अशा लोकांचा मी खूप तिरस्कार करते. मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. मला अशा लोकांची वीट येते. म्हणून मी त्यांना बोलते की, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला माझ्या कामाबद्दल काही मत मांडायचं असेल तर मी समजू शकते. तुम्ही त्यावर टीका करत असाल, त्याचे तुकडे-तुकडे करत असाल, तरीही मी त्याचा स्वीकार करेन. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा चारित्र्यावर मतं मांडण्याचा अधिकार तुम्हाला नाही.”
#WATCH | Delhi: Samajwadi Party MP Jaya Bachchan scolded a man and pushed him away, while he was trying to take a selfie with her. pic.twitter.com/UxIxwrXSM0
— ANI (@ANI) August 12, 2025
जया बच्चन यांनी अशा पद्धतीने चिडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना पापाराझींवर आणि फोटोग्राफर्सवर चिडताना पाहिलं गेलंय. “मी जेव्हा कुठे चालत जात असते, तेव्हा तुम्ही माझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करून माझे फोटो क्लिक करता. कशासाठी? मी माणूस नाहीये का?”, असा सवाल त्यांनी केला.
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीसुद्धा पोस्ट लिहित जया बच्चन यांच्या वागण्यावर टीका केली आहे. ‘सर्वाधिक बिघडलेली आणि विशेषाधिकार मिळालेली महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही,’ असं त्यांनी लिहिलंय.