
Amitabh Bachchan : 83 वर्षांचे अमिताभ बच्चन हे या वयातही खूप उत्साहाने , जोमाने काम करत असतात. मोठ्या पडद्यावर आलेला एखादा चित्रपट असो किंवा कौन बनेगा करोडपतीसारखा एखादा शो.. ते सतत कामातच गुंतलेले असतात. सतत चर्चेत असलेले बिग बी आणि बच्चन कुटुंबीय यांच्या खासगी आयुष्याकडेही लोकांचं खूप लक्ष असतं, त्यांचे अनेक किस्सेही बरेच लोकप्रिय आहेत. अमिताभ यांच्या प्रेमकहाणीपासून ते त्यांनी जिंकलेले पुरस्कार, हा संपूर्ण प्रवास खूप खास असून लोकांनाही त्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण हे बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल की अभिनेत्री आणि अमिताभ यांची पत्नी जया बच्चन यांना मात्र बिग बी यांच्याबद्दल तक्रार आहे. बिग बी यांच्या सवयीमुळे त्या खूप वैतागतात आणि याचा खुलासा जया यांनी सर्वांसमोरच केला होता. मात्र ते ऐकून महायनक देखील त्यांच्या बचावार्थ काहीच बोलू शकले नव्हते.
काय होती जया बच्चन यांची तक्रार ?
अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सगळेच फॅन आहेत, त्यांचं सूत्रसंचालन सर्वांनाच आवडतं. याच शोमध्ये जया यांनी अमिताभ यांची वाईट सवय सांगत तक्रार केली होती. ‘कौन बनेगा करोडपति’ च्या एका जुन्या एपिसोडमध्ये जया बच्चन या व्हिडीओ कॉलद्वारे जोडल्या गेल्या होत्या. त्या भागात त्यांची लेक श्वेता बच्चन आणि नात नव्या नंदा या स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्या एपिसोडमध्ये फुल्ल फॅमिली व्हाईब येत होती. तिथलं वातावरण अगदी कौटुंबिक झालं होतं. मात्र तेव्हाच सर्व प्रेक्षकांसमोर जया यांनी अमिताभ यांची तक्रार केली.
जया म्हणाल्या, ‘ प्रेक्षकांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. यांच्याकडे (अमिताभ) 2 नव्हे तर चांगले 5-7 फोन आहेत.. पण तुम्ही त्यांना फोन केला तर ते कधीच पोन उचलत नाहीत. आणि त्यानंतर जर एखादी गंभीर घटना घडली असेल तर ते आमच्यावरच रागावतात’ असं जया बच्चन म्हणाल्या. ‘ मला फोन का नाही केला, घरी एवढं सगळं रामायण झालं, मला काहीच सांगत नाही तुम्ही लोक.. असं म्हणत ते आम्हालाच ओरडतात’ असं जया म्हणाल्या. अरे पण यांना सांगणार तरी कसं ? असा सवालही जया यांनी विचारला.
4 तासांनी अमिताभ यांनी केला रिप्लाय
यादरम्यान, नव्या नंदानेही तिच्या आजीचं समर्थन करत त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. तेव्हाच नव्याने एक प्रसंग सांगितला, ती म्हणाली की एकदा तिची आजी विमानाने प्रवास करत होती आणि तिने ग्रुपमध्ये त्याबद्दल मेसेज केला होता. त्यावर सर्वांनी रिप्लाय करत हॅपी जर्नी अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर जया यांचं विमान उतरलं, सर्वांनी म्हटलं ‘वेलकम होम.’. त्यानंतर आजी घरी आली, जेवण वैगरे झालं. मात्र एवढ्या सगळ्यानंतर 4 तासांनी आजोबांचा ( अमिताभ बच्चन) यांचा रिप्लाय आला की ‘ओके जया सेफ फ्लाइट.’ हे ऐकून सगळे जण हसायला लागले. मात्र तेव्हाच अमिताभ यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांची लेक, नात आणि पत्नी यांच्यासमोर ते खरंच काही बोलू शकले नाहीत.