ही सर्वांत मोठी चूक.. अमिताभ बच्चन लग्नाबद्दल असं का म्हणतील? जया बच्चन यांचा खुलासा

जया बच्चन यांनी 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. त्यांनी बिग बींशी लग्न करण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं.

ही सर्वांत मोठी चूक.. अमिताभ बच्चन लग्नाबद्दल असं का म्हणतील? जया बच्चन यांचा खुलासा
Amitabh Bachchan and Jaya Bachchan
Image Credit source: Instagram
Updated on: Dec 02, 2025 | 3:45 PM

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांची मतं बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जातात. मुद्दा कोणताही असो, जया बच्चन त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधीच सोडत नाहीत. याचीच झलक त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतही पहायला मिळाली. आताची पिढी, बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या संकल्पना यांविषयी त्यांनी मोकळेपणे आपली मतं मांडली. यावेळी त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही व्यक्त झाल्या. इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चन कदाचित या लग्नाला त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असंही म्हणू शकतात, असं जया बच्चन म्हणाल्या. त्यांची ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत जया यांनी लग्नसंस्थेबाबत मुद्देसूद विचार मांडले. लग्नाकडे त्या कसं पाहतात, गेल्या 52 वर्षांत त्यांचे स्वत:चे विचार कसे बदलले आणि नात नव्या नवेली नंदाने लग्नाबाबत घाई करू नये, असं त्यांना का वाटतं, याबाबतही त्यांनी स्पष्ट केलं. अमिताभ बच्चन लग्नाबद्दल बोलतात का, असं विचारलं असता जया म्हणाल्या, “मी त्यांना कधी विचारलं नाही. पण कदाचित ते याला ‘माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक’ असं म्हणतील. पण मला ते ऐकायचं नाहीये.”

मुलाखतीत जया बच्चन यांना पुढे विचारण्यात आलं की, त्यांना तो क्षण आठवतोय का, जेव्हा त्या अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या? त्यावर उत्तर देताना जया बच्चन यांनी सांगितलं, “तुम्हाला जुन्या जखमा उकरून काढायला आवडतात का? मी गेल्या 52 वर्षांपासून एकाच व्यक्तीशी विवाहित आहे. यापेक्षा अधिक प्रेम मी करू शकत नाही. जर मी असं म्हटलं की लग्न करू नका, तर ही गोष्ट जुनी वाटू लागेल.. पण ते पहिल्या नजरेचं प्रेम होतं.”

या मुलाखतीत जया बच्चन त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा त्या खूप वेगळ्या असल्याचं मान्य केलं. दोघांच्या भिन्न स्वभावाची मस्करी करत त्या पुढे म्हणाल्या, “तुम्ही कल्पना करू शकता का की माझ्यासारख्या पुरुषाशी लग्न केलं असतं तर? तो वृंदावनात असता आणि मी दुसरीकडे कुठेतरी असते. ते फार बोलत नाहीत. ते माझ्यासारखं स्वत:चं मत मांडण्यासाठी स्वतंत्र नाहीत. ते स्वत:पुरतेच विचार ठेवतात. परंतु योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आपलं बोलणं मांडणं त्यांना चांगलं जमतं. ही गोष्ट मला जमत नाही. त्यांचं व्यक्तित्व वेगळं आहे. कदाचित म्हणूनच मी त्यांच्याशी लग्न केलं.”