जया बच्चन यांना लग्नाचा पश्चात्ताप? थेट म्हणाल्या “नातीने लग्नच करू नये..”
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नसंस्थेबद्दल आपले मोकळे विचार मांडले आहेत. लग्न ही फार जुनी परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर नात नव्याने लग्न करावं अशी माझी इच्छा नाही, असंही त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. नुकत्याच त्या मुंबईतील ‘वी द वुमेन’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी लग्नाबाबत स्पष्ट मत मांडलं. लग्न ही परंपरा ‘आऊटडेटेड’ (जुनी) असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर नात नव्या नवेली नंदाने लग्न करावं अशी माझी इच्छा नाही, असं त्या स्पष्टपणे म्हणाल्या. नव्या ही जया आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाची मुलगी आहे.
लग्न ही जुनी परंपरा आहे, असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न जया बच्चन यांना या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्यावर त्या म्हणाल्या, “हो अर्थात. नव्याने लग्न करावं अशी माझी इच्छा नाही. मी आता आजी आहे. नव्या काही दिवसांनी 28 वर्षांची होईल. मी आता इतकी म्हातारी झाले आहे की तरुण मुलींना मुलांच्या संगोपनाबाबत मी सल्ले देऊ शकत नाही. गोष्टी फार बदलल्या आहेत आणि आजकाल लहान मुलं इतकी हुशार आहेत की तुम्हालाही मात देतील.”
या मुलाखतीत बोलताना पुढे जया बच्चन यांनी लग्नाची तुलना ‘दिल्लीच्या लाडू’शी केली. त्या म्हणाल्या की “लग्नाची वैधता तुमच्या नातेसंबंधाची परिभाषा मांडत नाही. लग्न म्हणजे दिल्लीच्या लाडूंसारखं आहे. ते खाल्लं तरी त्रास आहे आणि नाही खाल्लं तरी त्रास आहे. त्यामुळे फक्त आयुष्याचा आनंद घ्या.”
याच कार्यक्रमात जया बच्चन यांनी पापाराझींवरही जोरदार टीका केली. “हे जे बाहेर ड्रेन पाइप टाइट घाणेरडे पँट घालून हातात मोबाइल घेऊन उभे असतात. त्यांना असं वाटतं की ते तुमचा फोटो आणि व्हिडीओ क्लिक करू शकतात आणि ते कशा पद्धतीचे कमेंट्स पास करत असतात. कुठून येतात ही लोकं”, अशा शब्दांत त्यांनी पापाराझी कल्चरला फटकारलं आहे.
जया बच्चन यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. त्यांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. अभिषेकने अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केलं असून त्यांना आराध्या ही मुलगी आहे. तर श्वेताने बिझनेसमन निखिल नंदाशी लग्न केलं असून त्यांना नव्या ही मुलगी आणि अगस्त्य हा मुलगा आहे.
