
अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचं सार्वजनिक जीवनातलं स्पेशली पापाराझींसोबतचं वागणं हे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पण नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान जया बच्चन यांनी पापाराझींबद्दल वेडेवाकडे शब्द काढल्यावर तर प्रकरण तापलंच. माझा पापाराझींशी कोणताही संबंध नाही, त्यांच्याशी माझं नातं शून्य असं जया बच्चन यांनी स्पष्ट केलं. बरखा दत्त यांचा We The Women शो मध्ये बोलताना त्यांनी “घाणेरडे कपडे घालणारे” आणि “मोबाईल हातात पकडून फिरणारे” लोक असा पापाराझींचा उल्लेख केला. पापाराझी हे Trained (प्रशिक्षित) नसतात, आणि त्यांचा उद्देश फक्त फोटो काढणं इतकाच असतो, म्हणून त्यांना मीडिया म्हणता येणार नाही असंही जया बच्चन म्हणाल्या.
त्यांच्या या तिखट आणि वेड्यावाकड्या बोलण्यामुळे पापाराझी मात्र चांगलेच दुखावे गेले आहेत. जया बच्चन यांच्या विधानाची निंदा करतानाच पापाराझी एक मोठं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. त्यांना (जया बच्चन) बॉयकॉट करावं, बहिष्कार टाकावं असं मत बऱ्याच पापाराझींनी व्यक्त केलं आहे. त्यांच्यासह सामान्य जनता आणि फिल्ममेकर अशोक पंडित यांनीही जया बच्चन यांच्या विधानाची निंदा करत त्यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन ?
एका कार्यक्रमात बरखा दत्त यांनी जया बच्चन यांना पापाराझींसोबत नातं कसं आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी थेट शब्दांत उत्तर दिलं. ‘माध्यमांसोबत माझं नातं फार चांगलं आहे. मी मीडियाचं प्रॉडक्ट आहे. पण पापाराझींसोबत माझं नातं शून्य आहे. माझं त्यांच्याशी काहीच नातं नाही. हे लोक कोण आहेत ? या देशातील लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं आहे का? तुम्ही त्यांना मीडिया म्हणता? मी मीडियातून आहे. माझे वडील पत्रकार होते. अशा लोकांसाठी माझ्या मनात खूप आदर, सन्मान आहे. पण बाहेर उभे असलेले, घाणेरडी पँट घातलेले विचित्र लोक आहेत, ते मोबाईल घेऊन येतात आणि त्यांना वाटतं आपण फोटो काढू शकतो… आणि नको त्या कमेंट्स करत असतात.. हे कसे लोक आहेत ? कुठून येतात ते ? काय शिक्षण आहे (त्यांचं) ? काय बॅकग्राऊंड आहे ?’ असे अनेक सवाल उपस्थित करत जया बच्चन अगदी परखडपणे बोलल्या.
#JayaBachchan on her relation with the paps and celebs calling paps at the airport! 🙈
She is so savage 🔥🤌 pic.twitter.com/2gvUkygZkE
— Bollywood Talkies (@bolly_talkies) November 30, 2025
पापाराझी भडकले
जया बच्चन यांची ती मुलाखत, ती विधानं सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहेत, ते ऐकून पापाराझी चांगलेच भडकले आणि त्यांनी जया बच्चन यांच्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना काही पापाराझींनी मत मांडलं. पापाराझी पल्लव पालीवाल यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “त्या (जया बच्चन) जे बोलल्या ते दुर्दैवी आहे. त्यांचा नातू अगस्त्यचा ’21’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जर पापाराझी प्रमोशन कव्हर करण्यासाठी आले नाहीत तर काय होईल? अमिताभ बच्चन हे दर रविवारी त्यांच्या घराबाहेर येतात, तेव्हा कोणतेही मोठे मीडिया कव्हरेज नसते, तेव्हा फक्त आम्ही फक्त पापाराझी असतो. एखाद्याच्या दिसण्यावरून, दिवसरात्र काम करणाऱ्या लोकांवरून त्यांचं मूल्यांकन करणं… कदाचित त्यांना वाटत असेल की आपण “मीडिया” नाही तर सोशल मीडिया आहोत. हे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा जास्त वेगाने पाहिलं जाणारं माध्यम आहे. जर जया बच्चन या पापाराझींशिवाय अगस्त्यच्या चित्रपटाचे प्रमोशन करू शकत असतील, जर त्या त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट करू शकत असतील, तर ठीक आहे. तुम्ही इतके मोठे सेलिब्रिटी आहात, तुम्ही असं बोलायला नको होतं” असं मत पालीवाल यांनी व्यक्त केलं.
तर पापाराझी मानव मंगलानी यांनीही मत मांडलं. ” मी जया बच्चन यांचा खूप आदर करतो, पण त्या डिजीटल युगासोबत विकसित झाल्या नाहीयेत. प्रिंट ते डिजिटलकडे होणारे बदल समजणं त्यांच्यासाठी कठीण आहे; कदाचित त्यांची मुलं आणि नातवंडं त्यांना ते समजावून सांगू शकतील. शिवाय, YouTubers आणि प्रचंड फॉलोअर्स असलेल्या वैयक्तिक कंटेंट क्रिएटर्सची अचानक वाढ झाल्याने या क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. हे लोक सेलिब्रिटींकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, जेणेकरून त्यांचा व्हिडिओ व्हायरल होईल. हे बिलकूल नैतिक नाही आणि ते ताबडतोब थांबवलं पाहिजे” असं मंगलानी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
याचदरम्यान एका पापाराझीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. “त्या (जया बच्चन) आमच्या गरिबीबद्दल बोलल्या. आमची भाषा, आमचे कपडे या बद्दल बोलल्या, पण आम्ही कधीही कोणत्याही सेलिब्रिटीला शिवीगाळ केलेली नाही. आम्ही काय करत आहोत ते आम्हाला माहीत आहे. जरी कोणी त्यांच्यासोबत फोटो किंवा सेल्फी काढला तरी त्या शिवीगाळ करतात आणि रागावतात. ते सगळं प्रेक्षकांना माहीत आहे. त्यांचा राग सर्वांना माहीत आहे. मी जास्त काही बोलणार नाही. लोकांना त्यांच्या ॲक्शन आणि रिॲक्शन काय आहेत आणि पापाराझी बरोबर आहेत की चूक हे कळेल, आम्ही योग्य की अयोग्य हे पाहणारे लोकचं ठरवतील. आम्ही चुकीचे नाही, आम्ही फक्त तुमचा भाग आहोत. आम्ही देखील माणूसच आहोत ना” अशा शब्दांत त्या पापाराझीने त्याची बाजू मांडली.