
अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या एका व्यक्तीला धक्का देताना दिसून येत आहेत. सेल्फी घेण्यासाठी ती व्यक्ती त्यांच्याजवळ येते, तेव्हा जया बच्चन त्यांना धक्का देऊन ओरडते. अशा पद्धतीने राग व्यक्त करण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी पापाराझी आणि फोटोग्राफर्सवर राग व्यक्त केला आहे. आता हा नवीन व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी या घटनेला लज्जास्पद असं म्हटलंय. तर दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या कृत्याची कडक शब्दांत निंदा केली आहे.
निर्माते आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिशएनचे (IFTDA) अध्यक्ष अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, ‘जया बच्चन यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीला फक्त या कारणासाठी धक्का दिला कारण तो सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे आणि अशा लोकांप्रती हा अपमान आहे, ज्यांनी त्यांना आपल्या सेवेसाठी निवडलंय. जनतेचा सेवक 24 तास नाराज आणि चिडचिडा कसा राहू शकतो? अशा दिग्गज कलाकारांकडून विनम्रता आणि करुणेची अपेक्षा असते, ज्यांना त्यांच्या प्रशंसकांकडून खूप प्रेम मिळालं आहे, जे त्यांना हे स्थान आणि प्रतिष्ठा देण्यासाठी जबाबदार आहेत.’
केवळ सेल्फी काढण्यावरून त्या व्यक्तीला धक्का देण्याची आणि ओरडण्याची काहीच गरज नव्हती, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. जया बच्चन यांना याआधीही अनेकदा अशाच पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी चिडल्याचं पाहिलं गेलं. त्यामुळे जनतेच्या सेवक असून त्या नेहमीच कशा चिडलेल्या राहू शकतात, असा सवाल अशोक पंडित यांनी उपस्थित केला आहे.
जया बच्चन यांनी याआधी दिलेल्या मुलाखतीत त्यांना फोटो काढायला का आवडत नाही, यामागचं कारण सांगितलं होतं. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणीही ढवळाढवळ केलेली मला आवडत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.