
अमेरिकन फिक्शन-थ्रिलर चित्रपट ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’ सध्या जगभरात प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 2 जुलै रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट दररोज जुने विक्रम मोडतोय आणि नवे रचतोय. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने इतकी जबरदस्त कमाई केली आहे की त्यात ‘रामायण’सारखे तीन बिग बजेट चित्रपट तयार होऊ शकतात. ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’ला प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. तर पाच दिवसांच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. ‘डेडलाइन’नं दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने जगभरात तब्बल 322 दशलक्ष डॉलर म्हणजेच 2700 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण- पार्ट 1’ या चित्रपटाचा बजेट 835 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानुसार ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’चं वर्ल्डवाइड कलेक्शन हे या चित्रपटाच्या बजेच्या तीन पटीने अधिक आहे. म्हणजेच या हॉलिवूड चित्रपटाने पाच दिवसांत जेवढी कमाई केली आहे, त्यात ‘रामायण’सारखे तीन भारतीय चित्रपट आरामात बनवले जाऊ शकतात. ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’ची भारतात चांगली कमाई सुरू आहे. सध्या थिएटरमध्ये आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’, अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनों’, काजोलचा ‘माँ’ आणि अक्षय कुमारचा ‘कन्नप्पा’ यांसारखे चित्रपट आहेत. असं असूनही ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’ने भारतात दमदार कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाचे इंग्रजीशिवाय हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जनसुद्धा प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटाने गेल्या पाच दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 47 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. ‘ज्युरासिक’ फ्रँचाइजीमधील सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी 2015 मध्ये ‘ज्युरासिक वर्ल्ड’ने 525.5 दशलक्ष डॉलरने ओपनिंग केली होती.
‘ज्युरासिक वर्ल्ड’चा पहिला चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक ऑस्कर पुरस्कार पटकावले होते. जगभरात या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागांविषयी प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता होती. ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’ या चित्रपटाचं दिग्दर्शक गॅरेथ एडवर्ड्सने केलंय. यामध्ये स्कारलेट जोहान्सन, महेरशला अली, जोनाथन बेली, रुपर्ट फ्रेंड, मॅन्युअल गार्सिया-रुल्फो, एड स्क्रेन आणि लुना ब्लेज यांच्या भूमिका आहेत.