
‘दुष्मन’ या चित्रपटात अभिनेते आशुतोष राणा यांनी साकारलेल्या गोकुल पंडित या भूमिकेची एक वेगळीच दहशत प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. 1998 मध्ये हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेत्री काजोलने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या, ज्यापैकी एक बलात्कार पीडितेची होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोल या चित्रपटाविषयी आणि त्यात तिने साकारलेल्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. चित्रपटाच्या विषयामुळे ती ऑफर स्वीकारावी की नाही, याबाबत ती साशंक होती. निर्माती पूजा भट्ट आणि दिग्दर्शिका तनुजा चंद्रा या दोघींनी जेव्हा सेटवरील सुरक्षित आणि आदरपूर्वक वातावरणाची हमी दिली, तेव्हाच काजोलने चित्रपटाला होकार दिला होता.
‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, “ती भूमिका खूप कठीण होती. मुद्दा विषयाचा होता. मी आधी थेट नकार दिला होता. पण निर्माती पूजा भट्टची इच्छा होती की मी ती भूमिका साकारावी. मी तिला म्हणाली होती की, मला स्क्रीप्ट आवडली, कल्पना आवडली पण मला ऑनस्क्रीन कुठलाच विनयभंग किंवा बलात्काराचा सीन करायचा नाही. यामागे दुसरं असं कोणतंच कारण नव्हतं. कारण एक कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा एखादा सीन करता, तेव्हा त्यातील भावना तुम्ही प्रत्यक्षात अनुभवत असता. त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेत असता. मला ते करायचं नव्हतं. मी माझं अभिनय कौशल्य दुसऱ्या गोष्टींमध्येही दाखवू शकते.”
चित्रपटात बलात्कार पीडितेची भूमिका साकारताना खूप अस्वस्थता जाणवल्याचाही खुलासा काजोलने केला. याविषयी तिने पुढे सांगितलं, “तेव्हा तनुजा आणि पूजा या दोघींनी मला समजावलं. आम्हीसुद्धा महिला आहोत, आम्ही समजू शकतो आणि यातून आपण मार्ग काढू, असं ते म्हणाले. आपण बॉडी डबलकडून सीन करून घेऊ, आपण असं करू, तसं करू, तुला अस्वस्थ वाटेल असं काहीच आपण करणार नाही, अशी माझी समजूत त्यांनी काढली. अशा पद्धतीने दुश्मन हा चित्रपट माझ्याकडे आला.”
‘दुश्मन’मध्ये काजोलने जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती. ज्यापैकी एकीवर बलात्कार करून आरोपी तिची हत्या करतो. त्यानंतर दुसरी बहीण त्याचा सूड घेण्याचं ठरवते. काजोलचा ‘कुछ कुछ होता है’ हा ब्लॉकबस्टर ज्या वर्षी प्रदर्शित झाला, त्याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.