
वादग्रस्त अभिनेता आणि स्वयंभू चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके सध्या मोठ्या वादात सापडला आहे. अंधेरी ओशिवरामधील गोळीबार प्रकरणात केआरके अटकेत आहे. पण अटकेनंतर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकून पोलिसही थक्क झाले आहेत. “हवेमुळे गोळी बिल्डिंगपर्यंत गेली” असा दावा केआरके यांनी केला आहे. 18 जानेवारी रोजी अंधेरीतील ओशिवरा येथील रहिवाशी भागात चार राऊंड फायरिंग झाली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केआरके यांना शुक्रवारी अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून लायसन्ससीड बंदूकही जप्त केली आहे. तसेच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, अटक झाल्यानंतर कमाल आर खान यांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यामुळे सर्वच बुचकळ्यात पडले आहेत. हसावं की रडावं असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे.
ओशिवरात गोळीबार, इमारतींना गोळ्या लागल्याचं उघड
ओशिवरा पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ओशिवराच्या रहिवाशी भागातील एका इमारतीत वेगवेगळ्या फ्लॅट्सला दोन गोळ्या लागल्या. त्यानंतर चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कमाल आर खान म्हणजे केआरके यांचीही कसून चौकशी करण्यात आली. यावेळी केआरके यांनी त्यांच्या लायसन्ससीड बंदुकीतून फायरिंग झाल्याचं कबूल केलं. पण यावेळी त्यांनी पोलिसांना अजबच कारण दिलं आहे. बंदुकीची फंक्शनॅलिटी चेक करण्यासाठी बंदूक क्लीन करत होतो, असं केआरकेने म्हटलंय.
“हवेमुळे गोळी पुढे गेली” – केआरकेचा दावा
आपल्या घरासमोरील मोठ्या मँग्रोजचं जंगल आहे. बंदूक चेक करत असताना जंगलाच्या दिशेने फायरिंग केली होती. कुणालाही गोळी लागू नये आणि नुकसान होऊ नये म्हणून तसं केलं. पण हवा एवढी होती की हवेमुळे गोळी थोडी आणखी पुढे गेली आणि ओशिवरातील एका इमारतीला लागली, असा दावा केआरके यांनी केला आहे. कुणालाही नुकसान होणार नाही, कुणालाही इजा होणार नाही, हा आपला हेतू होता, असा दवाही त्यांनी केला आहे. तर, या गोळीबारामुळे कुणालाही जखम झालेली नाहीये. पण अचानक झालेल्या गोळीबारामुळे सदर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
फायरिंग केआरकेच्या बंदुकीतूनच झाल्याची कबुली
या घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. पोलिसांनी फायरिंगसाठी वापरलेली गन जप्त केली आहे. केआरके यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. फायरिंगच्यावेळी सुरक्षा नियमांचं पालन करण्यात आलं होतं की नव्हतं, परवानाच्या अटीचं पालन केलं की नाही, याची माहिती पोलीस घेत आहेत.
वादांमुळे कायम चर्चेत असलेले केआरके
हेतूपूर्वक असो वा निष्काळजीपणे, रहिवााशी भागात गोळीबार करणं हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही सर्व बाबींचा तपास करत आहोत. बॅलेस्टिक रिपोर्ट, घटनास्थळाचं निरीक्षण आणि साक्षीदारांच्या साक्षी या गोष्टी घेऊन त्या तपासत आहोत, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, केआरके हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. वादग्रस्त विधानं केल्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या सिनेमांपेक्षा त्यांच्या वादग्रस्त विधानांचीच अधिक चर्चा होत असते.