कंगना रणौत-जावेद अख्तरमधील भांडण मिटले, अभिनेत्रीनेच सांगितलं नेमकं काय झालं
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत हिने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात सुरु असलेली कायदेशीर लढाई मिटली असल्याचे सांगितले आहे. नेमकं कशामुळे हे प्रकरण शांत झालं चला जाणून घेऊया...

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाची खासदार कंगना राणौतने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतची कायदेशीर लढाई मिटवली आहे. शुक्रवारी कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. कारण जावेद अख्तर आणि कंगना यांच्यामधील वाद हा जगजाहीर होता. मात्र, आता त्या दोघांमधील वाद मिटला असून जावेद अख्तर कंगनाच्या आगामी चित्रपटासाठी गाणी लिहिणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कंगना आणि जावेद अख्तर यांच्यामधील कायदेशीर लढाई इतक्या सहज कशी मिटली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जावेद यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘जावेद जी आणि मी आमची कायदेशीर बाब (मानहानी प्रकरण) मध्यस्थीद्वारे सोडवली आहे.’ तिने पुढे लिहिले की, ‘गीतकार मध्यस्थीदरम्यान खूप दयाळू आणि उदार होते. त्यांनी माझ्या पुढील चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासही सहमती दर्शविली आहे.’
कोर्टाने कंगनाला दिली होती ‘शेवटची संधी’
आज, २८ फेब्रुवारी रोजी कंगना रणौत मुंबईतील न्यायालयाबाहेर दिसली. यावेळी कंगनाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका न्यायालयाने कंगनाला तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यापूर्वी ‘शेवटची संधी’ दिली होती. कारण कंगना तिच्या आणि जावेद अख्तर यांच्यातील मानहानीचा खटला सोडवण्यासाठीच्या मध्यस्थी बैठकीला गैरहजर राहिली होती. मात्र, कंगनाने वांद्रे कोर्टात ती संसदेत हजर असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिला कोर्टात हजर राहणे शक्य झाले नसल्याची माहिती दिली होती.
काय होता वाद?
कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यातील कायदेशीर वाद मार्च २०१६ मध्ये सुरु झाला होता. हा वाद जावेद अख्तर यांच्या घरी झालेल्या बैठकीपासून सुरू झाला होता. त्यावेळी कंगना आणि बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादाची चर्चा सुरु होती. ज्यामध्ये त्यांच्या ई-मेल्सच्या देवाणघेवाणीचे सार्वजनिक भांडणात रुपांतर झाले होते. जावेद अख्तर हे रोशन कुटुंबीयांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कंगनाला हृतिकची माफी मागण्यास सांगितले होते.
कंगनाने या प्रकरणावर लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु २०२०मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर एका मुलाखतीदरम्यान तिने हा उल्लेख केला होता. तेव्हा जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. कंगनाने या तक्रारीनंतर कायदेशीर लढाई लढली. ज्यामध्ये तिने अख्तर यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला. मात्र, दिंडोशी सत्र न्यायालयाने अख्तर यांच्यावरील कारवाईला स्थगिती दिली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये दोघांनीही मध्यस्थी करण्यास सहमती दर्शवली.
