कंगना राणौतने निवडणूक लढवण्याबाबत केला सर्वात मोठा खुलासा
Kangana Ranaut : कंगना रणौत आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकते. शनिवारी आपल्या 37 व्या वाढदिवसानिमित्त तिने मंदिरात येऊन मातेचे दर्शन घेतले. पत्रकारांनी तिला लोकसभा निवडणूक लढवणार का असे विचारले असता कंगनाने यावर सकारात्मक उत्तर दिले आहे.

Loksabha election : अभिनेत्री कंगना राणौत सध्या चर्चेत आहे. कंगना देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून तिला उमेदवार घोषित केले जावू शकते. मात्र यावर अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही. आता खुद्द कंगनाने निवडणूक लढवणार का या वृत्ताला हवा दिली आहे. कंगनाने हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील बगलामुखी मंदिरात देवीचे आशीर्वाद घेतले. पत्रकारांनी तिला लोकसभा निवडणूक लढवणार का असे विचारले असता कंगना म्हणाली, जर आईची इच्छा असेल तर ती नक्कीच मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल.
कोणत्या पक्षातून लढणार कंगना?
कंगना कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे तिने सांगितले नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांसाठी अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळेच कंगनाच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून तिला तिकीट दिले जाऊ शकते. भाजपने निवडणुकीच्या मैदानात अनेक स्टार्सला आतापर्यंत उतरवले आहे. हेमा मालिनी यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.
कंगना रणौत नुकतेच एका मुलाखतीदरम्यान राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी भाजपची प्रवक्ता नाही, असे कंगना राणौतने नुकतेच सांगितले होते. निवडणुकीबाबत माझे मत मांडण्यासाठी ही माझ्यासाठी योग्य जागा आणि योग्य वेळ नाही. मी निवडणूक लढवण्याबाबत पक्षाकडूनच निवेदन यायला हवे. ही घोषणा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी केली जाईल.
कंगनाने काय दिले संकेत
‘तेजस’मध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री तिच्या वाढदिवशी आज बगलामुखी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. कंगनाने मंदिरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कंगनाने म्हटले की, ‘या वर्षीही मी माझ्या वाढदिवशी मां शक्तीचे दर्शन घेतले, हिमाचलमधील जगप्रसिद्ध बगलामुखी जीचे दर्शन घेतल्यानंतर, मी माझ्या कुटुंबासह शक्तीपीठ ज्वाला जीचे दर्शन घेतले. येथे प्राचीन काळापासून ज्वाला धगधगत आहे, कोणतेही पाणी किंवा पदार्थ ती ज्योत विझवू शकत नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. बगलामुखी जी शत्रूंचा नाश करते. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी आईची पूजा करण्यासाठी आलो आहे. माझ्या शत्रूंचाही नाश होवो आणि माझीही उन्नती होवो.
