Kangana Ranaut : कंगना रणौतची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय? विजय देवरकोंडाही…
Kangana Ranaut : कंगना रणौतनं वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत यांनी आपल्या वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंगनानं बुधवारी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. अभिनेत्रीनं परवानगीशिवाय तिचे फोटो, आवाज आणि एआय-निर्मित फोटो वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. गुरुवारी, न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं या प्रकरणात समन्स जारी केलं आणि अंतरिम स्थगितीसाठीच्या तिच्या अर्जावर उत्तर मागवणारी नोटीस देखील बजावली.
कंगनानं न्यायालयाला माहिती दिली की, सोशल मीडियावर तिच्या विरोधात पोस्ट केलेल्या अश्लील आणि आक्षेपार्ह मजकुरामुळे तिच्या प्रतिमेला हानी पोहोचतेय. अभिनेत्रीनं सांगितलं की, आक्षेपार्ह मजकूर एआय वापरून तयार करण्यात आला होता आणि तथ्य-तपासणीत असा कोणतीही मूळ फोटो अस्तित्वात नसल्याचं उघड झालं आहे.
अभिनेता विजय देवराकोंडाची याचिका
दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडानं गुरुवारी आपल्या वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या खंडपीठानं या प्रकरणी संक्षिप्त सुनावणी घेतली आणि सांगितलं की अभिनेत्रीच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यात येईल.
एजंट असल्याचं भासवणं
अभिनेत्याच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील स्वाती सुकुमार यांनी सांगितलं की, विजय देवराकोंडा बनावट जाहिराती आणि बनावट ओळख वापरल्यामुळे त्रस्त आहे आणि अनेक लोक त्याचे एजंट असल्याचे भासवत आहेत. अभिनेत्याचे फोटो वापरून विकल्या जाणाऱ्या वस्तूंवरही बंदी आणण्याची मागणी केली आहे.
अनेक कलाकारांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली
यापूर्वी बॉलिवूड अभिनेते ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि सलमान खान, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि क्रिकेटपटू अभिषेक शर्मा यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांनी आणि खेळाडूंनी त्यांच्या व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
