
दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘कांतारा : चाप्टर 1’ बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. पहाटेचा शो असो किंवा रात्री उशिराचा.. थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. गेल्या 12 दिवसांपासून हा चित्रपट विविध भाषांमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. 2025 या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. इतकंच नव्हे तर फक्त 10 चित्रपट वगळता ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : चाप्टर 1’ने गेल्या 100 वर्षांत प्रदर्शित झालेल्या सर्व ब्लॉकबस्टर्सचा विक्रम मोडला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे. कांताराची सुरुवात कशी झाली, दैव कोला किंवा भूत कोलाच्या प्रथेमागील कथा काय आहे, याचं चित्रपट या प्रीक्वेलमध्ये करण्यात आलं आहे.
सुरुवातीच्या 8 दिवसांत या चित्रपटाने 337.4 कोटी रुपये कमावत ‘सैयारा’ला मागे टाकलं होतं. त्यानंतर नवव्या दिवशी 22.25 कोटी रुपये, दहाव्या दिवशी 39 कोटी रुपये आणि अकराव्या दिवशी तब्बल 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. बाराव्या दिवशी सकाळी 10.40 वाजेपर्यंत 13.50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजेच आतापर्यंतची एकूण कमाई 451.90 कोटी रुपये झाली आहे. या आकड्यात आणखी वाढ होऊ शकते.
‘कांतारा : चाप्टर 1’ने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. यात फक्त दहा असे चित्रपट आहेत, ज्यांचा रेकॉर्ड अद्याप ऋषभ शेट्टीचा चित्रपट मोडू शकली नाही. हे कोणते चित्रपट आहेत, ते पाहुयात..
ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा : चाप्टर 1’ या चित्रपटाचं बजेट 125 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या 11 दिवसांत या चित्रपटाने 614.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा आकडा जगभरातील कमाईचा आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीसोबतच रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. दिवाळीपर्यंत या चित्रपटासमोर कोणतीच मोठी स्पर्धा नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर रश्मिका मंदाना आणि आयुषमान खुरानाचा ‘थामा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘कांतारा : चाप्टर 1’ला तगडी टक्कर देऊ शकतो.