ओटीटीवर आला 2025 मधला ब्लॉकबस्टर चित्रपट; ज्याची देशभरात झाली चर्चा
2025 या वर्षातील सर्वांत मोठा चित्रपट अखेर ओटीटीवर आला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 'छावा', 'सैयारा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनाही मागे टाकलं होतं. आता 200 हून जास्त देशांमधील लोक ओटीटीवर हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

2025 या वर्षात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी काहींना प्रचंड यश मिळालं, तर काहींना समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. ‘छावा’, ‘सैयारा’, ‘सितारे जमीन पर’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसोबत काही पॅन इंडिया दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व कामगिरी केली. ऑक्टोबरमध्ये असाच एक चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला, ज्याने केवळच देशभरातच नाही तर जगभरातच कमाल केली. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण हा चित्रपट नुकताच ओटीटीवर स्ट्रीम झाला आहे. ज्या चित्रपटाबद्दल आम्ही बोलतोय, त्याचं नाव आहे ‘कांतारा : चाप्टर 1’.
ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा : चाप्टर 1′ हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2025 पासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे दाक्षिणात्य भाषेतील व्हर्जन ओटीटीवर आले होते. परंतु अनेकजण त्याच्या हिंदी व्हर्जनच्या प्रतीक्षेत होते. अखेर हा हिंदी व्हर्जनसुद्धा आता प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. शिवाय प्रेक्षक ऋषभचा हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये पाहू शकतात. या चित्रपटात ऋषभ शेट्टी, गुलशन देवैया, रुक्मिणी वसंत यांच्या मुख्य भूमिका आहेत.
View this post on Instagram
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाचा हा प्रीक्वेल आहे. यामध्ये पंर्जुली देवाच्या उत्पत्तीची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यांची आत्मा पवित्र जंगलांचं रक्षण करते. या चित्रपटात दाखवलंय की, जेव्हा लोभ आणि शक्तीचं संतुलन बिघडू लागतं, तेव्हा पुन्हा सुव्यवस्था स्थापित करण्यासाठी दैवी शक्ती जागृत होतात. यात पंजुर्ली देवता संरक्षण करते, तर गुलिगा देवता न्याय देते. श्रद्धा, सूड आणि जगण्यासाठीच्या संघर्षांच्या विषयांची ही अत्यंत जादुई कथा आहे. शतकानुशतके जुन्या भूत कोला परंपरांचं चित्रण करणारा हा चित्रपट मंत्रमुग्ध करणारा आहे.
‘कांतारा : चाप्टर 1’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने 43 दिवसांत भारतात तब्बल 738.40 कोटी रुपयांची कमाई केली. तर परदेशात या चित्रपटाने 111 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
