करीना-करिश्माच्या संडे पार्टीत सुप्रिया सुळेंची हजेरी; अरमान जैनने स्वतः बनवले खास पदार्थ
करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी रविवारी कुटुंबीयांसोबत खास लंचचा आनंद घेतला. या पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. मात्र, सर्वाधिक चर्चा रंगली ती अरमान जैनने स्वतः बनवलेल्या सीफूड आणि फिश फ्रायची.

बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाची चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेली असते. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, तर कधी कौटुंबिक सोहळ्यांमुळे हे कुटुंब चर्चेत असतं. आता कपूर कुटुंबाच्या एका खास संडे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी रविवारी कुटुंबीयांसोबत खास जेवणाचा आनंद घेतला. या गेट-टुगेदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थितीही लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या पार्टीसाठी अरमान जैनने स्वतः किचनचा ताबा घेत खास पदार्थ बनवले.
कपूर कुटुंबाच्या संडे पार्टीत सुप्रिया सुळे
करीना आणि करिश्मा कपूर यांच्या आत्या रीमा जैन यांच्या घरी या खास कौटुंबिक गेट-टुगेदरचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत करीना, करिश्मा यांच्यासोबत सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. अरमान जैनने सोशल मीडियावर या भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कपूर आणि जैन कुटुंबातील सदस्य एकत्र बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. अरमानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचे आई-वडील रीमा जैन आणि मनोज जैन, पत्नी अनीसा मल्होत्रा, भाऊ आदर जैन यांच्यासह करीना, करिश्मा आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. करीना कपूरनेही या भेटीची झलक आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केली. तिने या फोटोला ‘रविवारची मस्ती’ असं कॅप्शन दिलं होतं.
पहा फोटो आणि व्हिडीओ-
अरमान जैन बनला शेफ
या पार्टीतील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट म्हणजे अरमान जैनचा कुकिंग अंदाज. अरमानला स्वयंपाकाची विशेष आवड असून तो अनेकदा वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसतो. यावेळीही त्याने कोणत्याही शेफवर जबाबदारी न सोपवता स्वत: किचनमध्ये उतरून पाहुण्यांसाठी खास मेजवानी तयार केली. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संडे पार्टीत फ्राइड सीफूड आणि फिश फ्रायचा खास बेत असल्याचं पहायला मिळालं. अरमानने या पोस्टला ‘रविवारचा फॅमिली टाइम आणि काही उत्तम फ्राइड फूड’ असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या पोस्टवर करिश्माने ‘Too yummy’ अशी कमेंट करत पदार्थांचं कौतुक केलं.
कोण आहे अरमान जैन?
अरमान जैन हा रीमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा असून करीना आणि करिश्माचा चुलत भाऊ आहे. तो फूड एंटरप्रेन्योर, चित्रपट निर्माता आणि होम कुक म्हणूनही ओळखला जातो. त्याने ‘द जंगल किचन’ या फूड ब्रँडची सुरुवात केली आहे. कपूर कुटुंबातील पारंपरिक पाककृती आणि जुन्या घरगुती चवी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या ब्रँडचा प्रयत्न आहे.
अरमानने ‘ट्रफल दाल बुखारा’, जंगली मटण, मटण यखनी पुलाव, गलौटी कबाब यांसारखे पदार्थ तयार केले आहेत. कपूर कुटुंबाच्या खाद्यपरंपरेवर आधारित ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी स्पेशलच्या निर्मितीतही त्याचा सहभाग होता. या कार्यक्रमातून कपूर कुटुंबातील सदस्यांच्या आठवणी, खाद्यसंस्कृती आणि एकत्र जेवण्याची परंपरा उलगडली होती. त्यामुळे अरमानच्या या संडे पार्टीने पुन्हा एकदा कपूर कुटुंबाचं खाण्यापिण्यावरील प्रेम चर्चेत आणलं आहे.