
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या 30,00,00,00,000 रुपयांच्या संपत्तीवरून अद्याप वाद सुरू आहे. संजयची आई राणी कपूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात नवीन खटला दाखल केल्यानंतर आता संपत्तीच्या या वादाला आता एक नवीन वळण लागलं आहे. ‘राणी कपूर फॅमिली ट्रस्ट’च्या वैधतेलाच आव्हान देत त्यांनी नवीन खटला दाखल केला आहे. या खटल्यात त्यांनी संजय कपूरची तिसरी पत्नी आणि सून प्रिया सचदेववर गंभीर आरोप केले आहेत. 80 वर्षीय राणी कपूर यांनी प्रियावर संजयला भडकावल्याचा आणि फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे. 12 जून 2025 रोजी संजय कपूरचं लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं. तेव्हापासून त्याच्या कथित 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. संजयची पत्नी प्रिया सचदेव हिच्याविरोधात करिश्माच्या मुलांकडूनही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राणी कपूर यांनी त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या ‘राणी कपूर फॅमिली ट्रस्ट’ला फसवं असल्याचं म्हटलं आहे. प्रिया सचदेवने इतरांसोबत मिळून राणी कपूर यांना त्यांच्या कौटुंबिक संपत्तीपासून वंचित ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर मुलगा संजयचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाल्याचाही दावा त्यांनी या खटल्यात केला आहे. संजयच्या निधनानंतर प्रियाने अनेक द्वेषपूर्ण आणि बेकायदेशीर कृत्ये केल्याचं राणी कपूर यांनी न्यायालयात सांगितलं. संजयच्या मृत्यूनंतर 13 दिवसांच्या शोक काळात सोना ग्रुपवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रियाने हे सर्व केल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रिया आणि इतरांविरुद्ध ट्रस्टचा वापर करण्यापासून किंवा त्यावर आधारित कोणतीही कारवाई करण्यापासून मनाई करण्याची मागणी राणी कपूर यांनी कोर्टात केली आहे.
संजय कपूर हा अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती होता. 2016 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी करिश्माची मुलंसुद्धा कायदेशीर लढाई लढत आहेत. 16 जानेवारी रोजी कोर्टाने करिश्मा कपूरला नोटीस बजावली होती. प्रिया सचदेवने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून करिश्मा आणि संजय कपूर यांच्यातील 2016 मध्ये घटस्फोटाच्या वेळी झालेल्या सेटलमेंटची कागदपत्रे मागितली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. चंदूरकर यांच्या खंडपीठाने करिश्माला नोटीस बजावत दोन आठवड्यांत उत्तर देण्याची मागणी केली आहे.