संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट; कॉल डिटेल रेकॉर्ड्समध्ये धक्कादायक खुलासा

करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्ती वादात मोठा ट्विस्ट आला आहे. प्रिया सचदेवचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स समोर आले आहेत. यामधून धक्कादायक खुलासा झाला आहे. नेमकं काय घडलं, ते सविस्तर जाणून घ्या..

संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट; कॉल डिटेल रेकॉर्ड्समध्ये धक्कादायक खुलासा
प्रिया सचदेव, संजय कपूर, करिश्मा कपूर
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल | Updated on: Jan 14, 2026 | 2:15 PM

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत बिझनेसमन संजय कपूरच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या खटल्याला मोठं वळण लागलं आहे. 12 जून 2025 रोजी संजय कपूरचं लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं. तेव्हापासून त्याच्या कथित 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. संजयची पत्नी प्रिया सचदेव हिच्याविरोधात करिश्माच्या मुलांकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. प्रियाने संजयच्या मृत्यूपत्राबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला आहे. तेव्हापासून कोर्टात हा वाद सुरू आहे. आता याप्रकरणी प्रियाचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDRs) समोर आल्याने खटल्यात मोठा ट्विस्ट आला आहे. या कॉल डिटेल रेकॉर्ड्समुळे संजयच्या मृत्यूपत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रिया सचदेवने न्यायालयात जी कागदपत्रे सादर केली, त्यात असं नमूद केलं आहे की, मृत्यूपत्रावर 21 मार्च 2025 रोजी गुरुग्राममध्ये स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी प्रिया तिथेच उपस्थित होती. परंतु सीडीआर डेटानुसार त्याच दिवशी ती दिल्लीत असल्याचं समोर आलं आहे. प्रियाच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि तिच्या प्रत्यक्ष ठिकाणामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. या धक्कादायक खुलाशामुळे या खटल्याला अनपेक्षित आणि गंभीर वळण मिळालं आहे. त्यामुळे भविष्यात हे प्रकरण अधिक वादग्रस्त टप्प्यात जाऊ शकते.

या संपूर्ण खटल्याबद्दल अद्याप करिश्मा कपूरने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु सीडीआर डेटामुळे मृत्यूपत्राबाबत तिच्या मुलांकडून केला जाणारा दावा आणखी ठाम होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यांच्या आणि न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्रियाने कोर्टात सादर केलेल्या मृत्यूपत्रात, संजय कपूरची सर्व वैयक्तिक संपत्ती तिला देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हे मृत्यूपत्र नोंदणीकृत नाही आणि त्याचं मृत्यूपत्रप्रमाणही घेण्यात आलेलं नाही. सध्याच्या घडीला करिश्मा कपूरची मुलं समायरा आणि कियान हे प्रिया सचदेवविरोधात संजय कपूरच्या संपत्तीवरून कोर्टात लढत आहेत. प्रियाने सादर केलेलं संजयचं मृत्यूपत्र खोटं आणि बनावट असल्याचा दावा त्यांनी याचिकेद्वारे केला आहे.