
ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकून देण्याची संधी देणारा लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा सुरू झाला आहे. ‘केबीसी’चा सतरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पहिल्याच आठवड्यात एका स्पर्धकाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. 11 ऑगस्टपासून हा सिझन सुरू झाला आहे. उत्तराखंडचे आदित्य कुमार हे या सिझनचे पहिले करोडपती ठरले आहेत. त्यांनी नंतर सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचंही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचं उत्तर माहीत नसल्याने त्यांनी शो सोडून देण्याचा निर्णय घेतला. सात कोटी रुपयांसाठी सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी ताजमहालशी संबंधित प्रश्न विचारला होता. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ‘ताजमहाल’शी संबंधित हा प्रश्न होता. हा सवाल नेहमी युपीएससीसारख्या स्पर्धापरीक्षांमध्ये विचारला जातो.
1930 च्या दशकात कोणत्या जपानी कलाकाराने भारताचा दौरा केला होता आणि ताजमहाल, सांची स्तूप आणि वेरूळ लेण्यांचं चित्रण करणारी एक प्रसिद्ध मालिका तयार केली होती?
आदित्य यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. म्हणून त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु शोमधून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना एक उत्तर निवडायचं असतं. त्यामुळे त्यांनी ‘D’ हा पर्याय निवडला होता, त्यावर हिरोशी नाकाजिमा असं नाव लिहिलं होतं. परंतु त्यांचं हे उत्तर चुकीचं होतं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर ‘C’ हा पर्याय होता. हिरोशी योशिदा हे त्याचं अचूक उत्तर होतं. सात कोटी रुपयांच्या या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकले नसले तरी आदित्य यांनी एक कोटी रुपये आणि एक कार जिंकली होती.
हॉटसीटवर बसलेले आदित्य कुमार या शोमध्ये त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतील एक मजेशीर किस्सासुद्धा सांगतात. “कॉलेजमध्ये असताना मी एकदा माझ्या सर्व मित्रांना सांगितलं होतं की माझी निवड केबीसीसाठी झाली आहे. संपूर्ण आठवडाभर मी त्याबद्दल मित्रांना खोटं सांगत होतो. इतकंच नव्हे तर केबीसीची टीम एका आठवड्यात व्हिडीओ शूट करण्यासाठी येईल, तेव्हा सर्वजण तयारीत राहा, असंही त्यांना सांगितलं होतं. ते ऐकून एकाने नवीन पँट घेतली, तर दुसऱ्याने नवीन शर्ट घेतला. एका आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी मला केबीसीच्या शूटिंगबद्दल विचारलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी मस्करी करत होतो. त्यामुळे यावेळी जेव्हा खरंच मला केबीसीतून कॉल आला आणि मी त्याविषयी मित्रांना सांगितलं, तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता. जेव्हा मी त्यांनी मेसेज दाखवला, तेव्हा त्यांना खरं वाटलं.” हा किस्सा ऐकून बिग बी त्यांना म्हणतात, “तुम्ही खूप वरपर्यंत पोहोचलेले आहात (हसतात).”