बाबांनी पंख्याला उलटं लटकावून चालू केला पंखा.. ‘केजीएफ’ फेम यशने सांगितला धक्कादायक किस्सा

'टॉक्सिक' आणि 'रामायण' या दोन्ही चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अभिनेता यश याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लहानपणीचा किस्सा सांगितला. वडिलांनी त्याला पंख्याला उलटं लटकावून पंखा चालू केला होता, असा धक्कादायक खुलासा त्याने केला.

बाबांनी पंख्याला उलटं लटकावून चालू केला पंखा.. केजीएफ फेम यशने सांगितला धक्कादायक किस्सा
यश
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 16, 2026 | 2:39 PM

‘केजीएफ’ फेम कन्नड अभिनेता यश आता बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. ‘टॉक्सिक’ आणि ‘रामायण’ या दोन्ही चित्रपटांमुळे तो तुफान चर्चेत आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यश त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि वडिलांच्या संघर्षाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यशचे वडील सर्वसामान्य बसचालक होते. यशला इतकी लोकप्रियता मिळूनही, त्याने कोट्यवधी रुपये कमावूनही वडिलांनी मात्र प्रामाणिकपणे नोकरी करणं कधीच सोडलं नाही, असं त्याने सांगितलं. तसंच लहानपणी आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे वडिलांकडून कशाप्रकारे कठोर शिक्षा दिली जायची, याचाही खुलासा त्याने केला आहे.

‘आप की अदालत’ या कार्यक्रमात यशने सांगितलं, “मी लहानपणी खूप हट्टी आणि खोडकर होतो. त्यामुळे मला वडिलांकडून खूप ओरडा आणि मार खावा लागला. एकदा तर वडिलांनी मला पंख्याला उलटं लटकावून पंखा चालू केला होता. मी बाबांचा खूप मार खाल्ला आहे. कारण मी प्रचंड खोडकर होतो, खूप खोड्या करायचो आणि हट्टीसुद्धा होतो. मी शाळेत असतानाही बाबा मला मारायचे, कॉलेजला गेल्यावरही ते मला मारायचे, अगदी कॉलेजच्या आतही ते मला मारायचे. माझ्या वडिलांची भीती फक्त मलाच नव्हती तर माझे वर्गमित्र आणि इतर मित्रदेखील त्यांना खूप घाबरायचे. माझे मित्र त्यांना ‘पप्पा टायगर’ म्हणायचे. एकदा त्यांनी मला कॉलेजमध्ये मारायला सुरुवात केली, तेव्हा मी बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं. त्यानंतर त्यांनी मला मारणं बंद केलं.”

आता चित्रपटसृष्टीत इतकं नाव कमावल्यानंतर वडील काय म्हणतात, असा प्रश्न यशला विचारला असता त्याने पुढे सांगितलं, “बाबांना आता खूप बरं वाटतं. पण त्यांना अजूनही काही गोष्टी खटकतात. त्यांना वाटतं की मी अजूनही लहान मुलासारखा आणि हट्टी आहे. माझे वडील बस ड्राइव्हर होते. ते दिवसाला फक्त 14 रुपये कमवायचे, पण त्यांना कधीच कशाची कमतरता भासली नाही. त्यांच्याकडे जे काही होतं ते त्यांनी सर्वस्व दिलं. मी हिरो बनल्यानंतरही वडिलांनी सरकारी बस ड्राइव्हरची नोकरी सोडण्यास नकार दिला. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, असं ते मला नेहमी म्हणायचे.”

यशचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो कियारा अडवाणीसोबत झळकणार आहे. याशिवाय नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये तो रावणाची भूमिका साकारत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us