‘केजीएफ’ स्टार यशसोबत कियाराचे इंटिमेट सीन्स; फायनल कट पाहताच दिग्दर्शकांकडे विनंती
अभिनेत्री कियारा अडवाणीने 'टॉक्सिक' या चित्रपटातील यशसोबतचे तिचे इंटिमेट सीन्स पाहून दिग्दर्शकांकडे खास विनंती केली आहे. आई झाल्यानंतर कियारा या गोष्टींची विशेष काळजी घेत असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी आई झाल्यानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच विविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कियाराने या चित्रपटातील काही खास सीन्सवरून निर्मात्यांसमोर आपली स्पष्ट बाजू मांडली आहे. यामुळे पोस्ट-प्रॉडक्शनवरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘Gulte’ने दिलेल्या वृत्तानुसार, कियाराने या चित्रपटाचे फायनल आऊटपुट पाहिल्यानंतर दिग्दर्शक गीतू मोहनदार आणि अभिनेता यश यांच्याकडे खास विनंती केली आहे. कियाराने चित्रपटातील तिचे काही इंटिमेट सीन्स काढून टाकण्याची किंवा त्यांची लांबी कमी करण्याची विनंती केली आहे.
कियाराने या चित्रपटात ‘केजीएफ’ फेम यशसोबत काही बोल्ड सीन्स शूट केले होते. शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने तिला आश्वासन दिलं होतं की, हे सीन्स तिच्या कम्फर्ट झोननुसारच शूट आणि एडिट केले जातील. परंतु फायनल एडिटिंग पाहिल्यानंतर कियाराने इंटिमेट सीन्सच्या प्रेझेंटेशनवर आक्षेप व्यक्त केला. त्यानंतर तिने या सीन्समध्ये बदल करण्यास सांगितलं आहे. या रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला आहे की कियाराने ‘टॉक्सिक’च्या निर्मात्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्यांनी या सीन्सची लांबी कमी करावी किंवा फायनल कटमध्ये त्यांना आणखी ‘सॉफ्ट’ बनवून दाखवावं.
आई झाल्यानंतर कियारा तिच्या स्क्रीन इमेजवरून अधिक सजग झाल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी अद्याप कियाराची टीम किंवा प्रॉडक्शन टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. याआधीही ‘टॉक्सिक’मधील काही सीन्सवरून वाद निर्माण झाला होता. चित्रपटाच्या टीझरमध्ये यश ‘राया’ नावाच्या गँगस्टरच्या भूमिकेत दिसला होता. टीझरमधल्या एका सीनमध्ये तो स्मशानभूमीजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये एका महिलेसोबत सेक्स करताना दिसून आला होता. या सीनवरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती. टॉक्सिक या चित्रपटात तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि नयनतारा यांच्याही भूमिका आहेत.
‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनाची तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी हा चित्रपट रणवीरच्या ‘धुरंधर 2’सोबत 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. त्यानंतर ही तारीख पुढे ढकलून 4 जून निश्चित करण्यात आली होती. परंतु 29 एप्रिल रोजी यशकडून पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या नवीन तारीखेची प्रतीक्षा करत आहेत.