Nepal Gen Z Protest: रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही..; किरण मानेंच्या पोस्टवर भाजप खवळले

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये 'जेन झी' वर्गाकडून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवरून भाजप समर्थक आक्रमक झाले आहेत.

Nepal Gen Z Protest: रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही..; किरण मानेंच्या पोस्टवर भाजप खवळले
Kiran Mane's post on Nepal
Image Credit source: Facebook
Updated on: Sep 11, 2025 | 11:11 AM

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये ‘जेन झी’ वर्ग रस्त्यावर उतरल्याने सरकारविरोधात दोन दिवस हिंसक आंदोलनं झाली. निदर्शकांचा संताप इतका अधिक होता की, त्यांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली. त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं. तिथल्या भयानक परिस्थितीबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जातेय. अशातच अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमधून त्यांनी भाजपच्या समर्थकांना टोला लगावला आहे. किरण माने यांच्या या पोस्टविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून (ABVP) सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

किरण मानेंची पोस्ट

‘भक्तडुक्कर पिलावळींनो, नेपाळ बघताय नं? आपल्याकडे फरक इतकाच असेल की, रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही पिसले जाणार. सुट्टी नॉट’, असा खोचक टोला त्यांनी भाजपच्या समर्थकांना लगावला आहे.

या पोस्टविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून किरण मानेंवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारतातील लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी त्यांची ही पोस्ट असल्याचा आरोप ABVP ने केला आहे. किरण माने हे सोशल मीडियावर नेहमीच त्यांची मतं बेधडकपणे मांडत असतात. यावरून अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नेपाळबद्दल लिहिलेल्या या पोस्टवर 400 हून अधिकांनी कमेंट्स केल्या आहेत. यावरूनही त्यांनी पुढे आणखी एक पोस्ट लिहिली. ‘माझ्या पोस्टवर चारशे कमेंट्स. भक्तडुक्कर पिलावळ म्हणे, घाबरला. कमेंट्स ऑफ ठेवल्यात. अरे बुळग्यांनो, तुपकट मेंगळ्यांना घाबरायाला तुम्ही ट्रम्प आणि मी फेकू आहे का? पण तुमचा कार्यक्रम फिक्स’, असं उत्तर त्यांनी ट्रोलर्सना दिलं आहे.

दरम्यान, भारताने नेपाळमधील आपल्या नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला आणि किमान 300 जण जखमी झाले. काठमांडूमधील भारतीय दूतावासाने नेपाळमधील सर्व नागरिकांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तिथं प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता असलेल्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकसुद्धा जारी केला आहे.

काठमांडू इथला भारतीय दूतावासातील दूरध्वनी क्रमांक: 977 – 980 860 2881, 977 – 981 032 6134 (व्हॉट्सॲप कॉलही करू शकता.)