
मुंबई : 13 मार्च 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने जरी त्याच्या दोन्ही पूर्व पत्नींना घटस्फोट दिला असला तरी हे तिघंही एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांसोबत वागतात. आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव यांचंही एकमेकांशी खूप चांगलं नातं आहे. या दोघी अनेकदा एकत्रही दिसतात. त्यामुळे अनेकांना आमिरच्या कुटुंबाविषयी प्रश्न पडतो. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण राव या सर्व गोष्टींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आमिर आणि किरणने 2005 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर 2021 मध्ये दोघं विभक्त झाले.
आमिरसोबतच्या लग्नाविषयी किरण म्हणाली, “मी खूप नशीबवान आहे की माझं लग्न एका कुटुंबात झालं. एक असं कुटुंब ज्यावर मी प्रेम करायचे आणि करत राहीन. आमिरची आई झीनत हुसैन यांच्यावर माझं सर्वाधिक प्रेम आहे. आमिरचं कुटुंब खूप अनोख्या पद्धतीचं आहे. आमिर आणि रिना यांचा 2002 मध्ये घटस्फोट झाला, मात्र त्यानंतरही रिनाने कधीच कुटुंब सोडलं नव्हतं. रिनाच्या बाबतीत हे कुटुंब खूप प्रोटेक्टिव्ह आहे आणि जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हासुद्धा रिना या कुटुंबाचाच एक भाग होती. आमच्यात कालांतराने खूप चांगली मैत्री झाली. रिना एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे.”
घटस्फोटानंतरही कुटुंब वेगळं झालं नसल्याचं किरणने स्पष्ट केलं. आमिर आणि किरणचा मुलगा आझाद, आमिर आणि रिनाची मुलं आयरा आणि जुनैद हे सर्वजण कुटुंब या धाग्याशी जोडले गेले आहेत. जानेवारी महिन्यात जेव्हा आयराचं लग्न झालं, तेव्हा सर्वजण मिळून या लग्नासाठी तयारी करत होते आणि आमिरचं सर्व कुटुंब या लग्नसोहळ्याला उपस्थित होतं. “लोकांना असं वाटत असेल की हे संपूर्ण कुटुंबच विचित्र आणि क्रेझी आहे. पण आम्ही असेच आहोत आणि हेच आमचं सत्य आहे”, असं किरण पुढे म्हणाली.
किरण आणि आमिरने 2005 मध्ये लग्न केलं. या दोघांना सरोगसीच्या माध्यमातून मुलगा झाला. लग्नाच्या 15 वर्षांनंतर किरण आणि आमिरने विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या आयरा खानच्या लग्नात किरण आणि रिना या दोघींनी मिळून सर्व तयारी केली होती.