
छोट्या पडद्यावरील अनेक मालिका सुरू होतात आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार, टीआरपीनुसार त्या किती काळ चालणार हे ठरवलं जातं. काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतात. तर काही मालिकांना अवघ्या काही महिन्यांतच गाशा गुंडालावा लागतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेसोबत असंच काहीसं घडलं आहे. वर्ष पूर्ण होण्याआधीच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर या नवीन वर्षात ती नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच एक लोकप्रिय मालिक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका येत्या 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे रेश्मा शिंदेच्या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. रेश्मा शिंदेची मालिका आता रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु रात्री 10.30 वाजता गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका प्रसारित केली जात होती. त्यामुळे या वेळी रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका दाखवण्यात येणार असल्याने ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही बंद होणार असल्याचं समजतंय. याविषयी आता गिरीजा प्रभूची पोस्टसुद्धा चर्चेत आली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाजलेल्या मालिकेतील गाजलेली जोडी म्हणजेच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव हे ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र आले होते. ही मालिका 28 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली होती. यामध्ये त्यांनी यश आणि कावेरीची भूमिका साकारली होती.
ही मालिका जेव्हा सुरू झाली, तेव्हा रात्री 8 वाजता प्राइम टाइमला ती प्रसारित करण्यात येत होती. परंतु नंतर तिची वेळ बदलून रात्री 11 वाजता करण्यात आली. काही दिवसांनंतर पुन्हा मालिकेची वेळ बदलण्यात आली. 11 वरून ही वेळ रात्री 10.30 वाजता करण्यात आली होती. अखेर या मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच सेटवर कलाकारांनी शेवटचा दिवस साजरा केला. गिरीजा प्रभूने ‘माझ्याकडे शब्द नाहीत..’ असं म्हणत सोशल मीडियावर रडण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. या मालिकेत गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्यासोबतच सुकन्या मोने, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, वैभव मांगले, नंदिनी वैद्य यांच्याही भूमिका होत्या.